कामेरी – राजकारणात सुरवातीच्या काळात स्व. भाऊसाहेब महाराज व कै. भीमरावदादा घोरपडे यांची राजकारणाची दिशा वेगळी होती. आज भाजपच्या माध्यमातून आपण सर्व जण एकत्र आलो आहोत. भाजपचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करून कराड उत्तरमध्ये पक्षाची ताकद वाढवून येणाऱ्या 2024 ला कराड उत्तरमधून मनोजदादा घोरपडे यांना माझी पूर्ण ताकद देणार असून स्व. भाऊसाहेब महारांजाच्या विचाराचा वारसा जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांची संपूर्ण फळी त्यांच्या पाठीशी उभी करू, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
मत्यापूर (ता. सातारा) येथे यशस्वी उद्योजक संग्राम घोरपडे (बापू) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोरेगावचे आ. महेश शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे,भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, जिल्हा बैंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष जाधव, युवा सेना जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने आदी मान्यवर उपस्थित होते. मनोजदादा घोरपडे यांनी कराड उत्तरमध्ये खूप काम केले आहे. मागच्या वेळी झालेल्या सर्व गोष्टींचे आपण सर्वच साक्षीदार असून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एकत्र काम करू, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
मनोजदादा काय किंवा मी काय आम्ही दोघेही सर्वसामान्य कुटुंबातूनच वर आलेलो आहोत. संघर्ष हा आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे, असे सांगून आ. महेश शिंदे म्हणाले, “”माजी पालकमंत्र्यांनी घोरपडे कुटुंबीयांना गेल्या दीड वर्षात प्रचंड त्रास दिला. त्याची दुप्पट परतफेड करणार असून मनोजदादा यांना पुढील काळात संपूर्ण ताकद देणार आहे.’ साखर कारखान्याच्या माध्यमातून लवकरच एक लाख लिटर क्षमतेचा डिस्टलरी प्लान्ट उभारण्यात येणार असून रोजगार उपलब्धतेसाठी भागात नवनवीन उद्योग उभारण्यावर भर देणार आहे, असे मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले. संघर्ष आम्हाला नेहमीचाच आहे. पण या संघर्षाच्या काळात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व आ. महेश शिंदे यांनी मोलाची मदत केली, ही बाब आम्ही विसरणार नसून त्यांच्यासोबत राहूनच यापुढील सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढविणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार प्रभाकर घार्गे, वैभव चव्हाण, महेश जाधव, अनिल देसाई, रामकृष्ण वेताळ, संग्राम घोरपडे, विक्रम पावसकर आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्योजक संग्राम घोरपडे (बापू) यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास भाजप तालुकाध्यक्ष महेश जाधव, चंद्रकांत मदने, सुरेश पाटील, रणजित माने, शेखर माने, माजी चेअरमन शंकरराव घोरपडे (काका), विकास गायकवाड, माजी व्हा.चेअरमन विश्वास शेडगे, रमेश कणसे, डॉ. नागेश जाधव, अण्णासाहेब निकम, माधवराव गुरव, सुरेश कुंभार, विक्रम पवार पापा, बजीरंग जाधव, सुभाष शेठ, हिंदुराव ढाणे, जयवंत जाधव, प्रमोद आप्पा, महेश चव्हाण, धनाजी पाटील, इस्माईल पटेल, सचिन माने, विश्वास जाधव, शहाजी शेठ काळभोर, तसेच कराड उत्तर मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक पंचायत समितीचे माजी सदस्य संजय घोरपडे यांनी केले. विश्वासराव काळभोर (आप्पा) यांनी आभार मानले.
उमेदवारी कराड उत्तरमधूनच
राजकारणामुळे आम्ही मागच्या काही काळामध्ये खूप भोगले आहे. त्यामुळे 2024 ला मनोजदादांची उमेदवारी कराड उत्तरमधून असणारच आहे, असे संग्राम घोरपडे (बापू) यांनी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजवून घोषणा दिल्या.