मुंबई – ‘लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘सरी’ चित्रपट 5 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या तो पसंतीस उतरत आहे. अनेक कलाकारांनीही हा चित्रपट चांगला असल्याचे आपल्या सोशल मीडियावरून सांगितले आहे. चित्रपटाची कथा, कलाकार या सगळ्या जमेच्या बाजू असतानाच या चित्रपटाच्या संगीताचीही संगीतप्रेमींना भुरळ पडली आहे.
मंदार चोळकर यांचे बोल लाभलेल्या या गाण्यांना अमितराज आणि अरजीत चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केले आहे. याशिवाय ‘सरी’ची खासियत म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार बी. अजनीश लोकनाथ यांचे संगीत ‘सरी’ चित्रपटाला लाभले आहे. यापूर्वी बी. अजनीश लोकनाथ यांनी ‘कांतारा’ या सुपरहिट चित्रपटाला संगीत दिले होते.
प्रेमाची परिभाषा सांगणाऱ्या ‘सरी’मध्ये प्रेमाचा त्रिकोण असून दिया (रितिका श्रोत्री) अखेर कोणाचा स्विकार करणार रोहित (अजिंक्य राऊत) की आदीचा (पृथ्वी अंबर), हे सरप्राईज प्रेक्षकांना ‘सरी’ पाहिल्यावरच मिळेल. या चित्रपटात मैत्री, प्रेम, विनोद, भावना, नात्याचे महत्व असे मनोरंजांचे संपूर्ण पॅकेजच पाहायला मिळणार आहे.