गांधीनगर : गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात भाजपच्या एका बड्या नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सोमवारी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. भाजप नेते पत्नीसह मंदिरात दर्शनासाठी गेले असताना ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना वलसाड जिल्ह्यातील राता भागात घडली. भाजपचे उपाध्यक्ष शैलेश पटेल हे कुटुंबासह शिवमंदिरात सकाळी दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते येथून निघाले असता, त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या चौघांनी शैलेश पटेल यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली.
चार राऊंड गोळीबार करून मारेकरी पळून गेले. जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे समजते. शैलेश पटेल यांची हत्या झाली त्यावेळी त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत होते. मात्र, कुटुंबीयांनी आता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाला न्याय मिळत नाही आणि आरोपींना पकडले जात नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
दिवसाढवळ्या अशा प्रकारची हत्या होत असेल तर उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये फरक काय, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश पटेल हे पत्नीसोबत दर सोमवारी शिवमंदिरात जात असत. आज सकाळी 7.15 च्या सुमारास ते पत्नीसह दर्शनासाठी शिवमंदिरात पोहोचले होते.
आरोपींनी ही घटना घडवली त्यावेळी शैलेश पटेल पत्नी येण्याची वाट पाहत कारमध्ये बसले होते. अचानक एक व्यक्ती त्याच्याजवळ आली. शैलेशला काही समजण्यापूर्वीच एक दुचाकी त्यांच्याजवळ आली. त्यावर आलेल्या आरोपींनी शैलेशवर चार राऊंड गोळीबार केला. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.