कान्हा : अबाऊट टर्न

हिमांशू

चोरी आखिर चोरी होती है… चाहे वह एक पैसे की हो या एक लाख की… “दीवार’ चित्रपटात शशी कपूरला हे ज्ञान एका शिक्षकाच्या घरात मिळतं. तत्पूर्वी या शिक्षकाचा लहान मुलगा शशी कपूरच्या म्हणजे इन्स्पेक्‍टर रवीच्या बंदुकीची गोळी लागून जखमी होतो. “चोर-चोर’ म्हणून सगळेजण त्या मुलाच्या मागे पळत असतात. इन्स्पेक्‍टर रवी त्याला थांबण्याचा इशारा देतो आणि मुलगा थांबत नाही, म्हणून त्याच्या पायावर गोळी झाडतो.

कुटुंबीयांची भूक सहन न झाल्यामुळे या मुलाने फक्‍त एक पाव चोरलेला असतो. मग इन्स्पेक्‍टर शिक्षकाला घरी भेटायला येतो वगैरे… ही गोष्ट इथे संपली नाही. इथून ती सुरू झाली. असे बालगुन्हेगार आणि याच चित्रपटातल्या अमिताभ बच्चनसारखे बालकामगार आपल्या व्यवस्थेनं मोठ्या संख्येनं तयार केले.

आपल्याकडे एखादा गुन्हा घडला की आकाशपाताळ एक करणं आणि तो घडण्याच्या कारणांकडे कानाडोळा करणं ही पद्धतच आहे. परंतु किमान लहान मुलांच्या बाबतीत आपण संवेदनशील राहायला हवं होतं. उमलत्या वयात हातून गुन्हेगारी कृत्यं का घडतात? कोणती पार्श्‍वभूमी त्याला जबाबदार ठरते? गुन्हा करताना बालमनात काय विचार येत असतील? हे प्रश्‍न आपण ऑप्शनला टाकले आणि त्यामुळेच अखेर पुराणातले दाखले देत या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्याची वेळ बिहारमधल्या एका न्यायालयावर आली.

मुलांची असहायता आणि परिस्थितीचा विचार करूनच आपल्याला त्यांच्या वर्तनाकडे पाहावं लागेल, असं सांगत जिल्ह्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी एका मुलाला निर्दोष मुक्‍त केलं. शेजाऱ्याच्या फ्रिजमधून मिठाई चोरून खाल्ल्याचा आरोप या मुलावर होता. हा अल्पवयीन मुलगा आपल्या आजीकडे राहायला आला होता. त्याचे वडील बस ड्रायव्हर होते; पण अपघातात मणक्‍यांना मार बसल्यामुळे ते झोपून असतात. आई मनोरुग्ण आहे.

आजीचंही वय झालंय आणि त्यामुळे त्याला सोडवायला न्यायालयात येऊ शकेल, असं घरात कुणीही नाही. अखेर न्यायालयच त्या मुलाच्या पाठीशी उभं राहिलं. पोलिसांनी एवढ्या छोट्याशा घटनेत एफआयआर कसा दाखल करून घेतला, याबद्दल न्यायालयाने आश्‍चर्य व्यक्‍त केलं. वास्तविक मोठमोठ्या गुन्ह्यांमध्येही एफआयआर नोंदवून घ्यायला टाळाटाळ कशी केली जाते, याचा अनुभव अनेकांना आहे.

“स्टेशन डायरी’त नोंद करून तंबी देऊन या मुलाला सोडता आलं असतं. पण पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला न्यायालयात आणलं. घटना अगदी किरकोळ असली, तरी त्यातला महत्त्वाचा भाग असा की, न्यायाधीशांनी थेट श्रीकृष्णांच्या लीलांशी या घटनेचा संबंध जोडला. म्हणाले, आपल्या संस्कृतीत भगवान श्रीकृष्ण अनेकदा शेजाऱ्यांच्या घरातून लोणी चोरायचे आणि भांडं फोडायचे. या घटनेकडेही याच दृष्टीनं पाहायला हवं.

न्यायाधीशांचा एक प्रश्‍न महत्त्वाचा आहे तो असा की, श्रीकृष्णाच्या काळात आजच्यासारखा समाज असता तर देवांच्या बाललीलांच्या कथा ऐकायला मिळाल्या असत्या का? अर्थात, आजचा कान्हा पोटाला चिमटा बसल्यामुळे चोरी करतो, हा फार मोठा फरक आहे आणि त्याकडे गांभीर्याने पाहायलाच हवं.

कुठे दूर डोंगरपाड्यावरचा कान्हा कुपोषित आहे. कलियुगात त्याच्या हिश्‍शाचं “लोणी’ झारीतले शुक्राचार्य पळवतायत आणि त्यांच्याच “लीलां’च्या सुरस कथा ऐकून आजचे “गोकूळवासी’ करमणूक करून घेतायत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.