कामशेत – जिल्ह्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या बहुचर्चित रिंगरोडसाठी जिल्ह्यातील एकूण 13 गावांनी वाढवून दिलेल्या मुदतीमध्ये संमतीपत्र दिलेली नाहीत. यामध्ये मावळ तालुक्यातील सहा गावांचा समावेश आहे. यावर उपाय म्हणून रिंगरोड पूर्ण करण्यासाठी या सर्व गावांमधील भूसंपादन सक्तीने केले जाणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने 172 किलोमीटर लांबी आणि 110 मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेत पूर्व आणि पश्चिम असे दोन भागात भूसंपादन करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये पूर्व भागात मावळातील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी वर्तुळाकार रस्त्याबाबत भूसंपादन अधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्पबाधितांना नोटीस पाठविल्यानंतर सामाईक क्षेत्र असल्याने परस्पर मतभेद, वाद, तसेच मृत्यू नोंद, वारस नोंद आणि त्यांची कागदपत्रांची उपलब्धता, सातबाऱ्यावरील नाव असलेल्या व्यक्ती परगावी असल्याने विलंब, जागा आणि क्षेत्रफळावरून असलेले कौटुंबिक वाद, कागदोपत्री न झालेले फेरफार अशा अनेक कारणांमुळे संमतीपत्र रखडले आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्त्यातील पश्चिम भागातील गावांचे भूसंपादन सुरू आहे. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन मालकांना नोटीस पाठवून 21 ऑगस्टपर्यंत संमतीपत्रे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, नोटीसची मुदत संपुष्टात आल्याने मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील 13 गावांमधील स्थानिकांनी अद्याप संमतीपत्र दिलेले नाही. परिणामी भूसंपादनास विलंब होत आहे. या कारणास्तव जिल्हा प्रशासनाकडून सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भूसंपादनासाठी एक हजार कोटींचा निधी
वर्तुळाकार रस्त्याच्या पश्चिम मार्गावरील 34 गावे बाधित होत असून भूसंपादनाबाबत स्थानिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. गावांमध्ये निवाडा प्रक्रिया राबवून दर निश्चिती देखील करण्यात आली. त्यानुसार राज्य सरकारकडून भूसंपादनाला गती देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. त्यानंतर भूसंपादनाला वेग आला आहे. 13 गावातील स्थानिकांनी संमतीपत्र दिलेले नाही. पुढील भूसंपादनासाठी आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सक्तीने भूंपादन केले जाणार आहे.
या गावातील होणार सक्तीने भूसंपादन
मावळ : उर्से, पांदली, बेबेडहोल, धामणे, पाचाने आणि चांदखेड
मुळशी : केमसेवाडी, अंबडवेट आणि जवळ
हवेली : खामगाव, मांडवी, मोरलेवाडी आणि थोपटेवाडी