कळसकर, अंदुरेकडूनच डॉ.दाभोलकरांवर गोळीबार

पुणे – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी घेण्यात आली. तेव्हा चाचणीत मी आणि साथीदार सचिन अंदुरे याने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती कळसकरने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिली.

सीबीआयकडून याबाबत मंगळवारी विशेष न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. त्यात ही माहिती कळसकरने दिली. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कळसकरचे वकील ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 25 मे रोजी सीबीआयने अटक केली होती. गेल्या वर्षी जून महिन्यात मी ऍड. पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी ऍड. पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत सीबीआयला सांगितले.

फेब्रुवारी 2019 मध्ये सीबीआयकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रासोबत न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. सीबीआयचे विशेष सरकारी वकील ऍड. प्रकाश सूर्यवंशी यांनी मंगळवारी या अहवालाचा आधार घेऊन बाजू मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.