पुणे – शहरातील हवेची गुणवत्ता खालावली असून, येत्या काळात हवेच्या प्रदूषणात वाढ होणार असल्याचा इशारा आयआयटीएम-सफर या संस्थेने दिला आहे. देशातील चार प्रमुख महानगरांपैकी दिल्लीत आणि पुण्याची हवेची गुणवत्ता खालावली असल्याचे संस्थेच्या नोंदीतून समोर आले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) संस्थेच्या “सफर’ उपक्रमांतर्गत देशातील दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या चार महानगरांमधील हवेच्या गुणवत्तेची सातत्याने नोंद घेतली जाते. संस्थेच्या नुकत्याच करण्यात आलेल्या पाहणीनुसार, पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली असून, ती “चांगली’ या स्तरावरून “समाधानकारक’स्तरावर पोहोचली आहे.
विशेष म्हणजे पुण्यातील हवेची गुणवत्ता आणि दिल्लीतील हवेची गुणवत्ता ही समानस्तरावर पोहोचली आहे. हवेतील प्रदूषकांमध्ये वाढ झाल्याने हवेची गुणवत्ता खालावली असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने “पीएम 10′ या घटकाचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.
संस्थेच्या नोंदीनुसार, हवेतील “पीएम 10′ या प्रदूषकाचे प्रमाण 186 प्रति क्युबिकघन मीटर आहे, तर “पीएम 2.5’या प्रदूषकाचे प्रमाण 70 प्रति क्युबिक घनमीटर इतके आहे. येत्या दोन दिवसांत हवेतील “पीएम 10′ या प्रदूषकाचे प्रमाण 223 क्युबिकघन मीटरपर्यंत वाढेल असा अंदाज वर्तवला आहे.
गेल्या आठवडाभराहून अधिक काळ शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वातावरणात प्रदूषके विरघळून न जाता तशीच राहिली तसेच अलीकडे वाहतूक आणि उद्योगाचे प्रमाणही वाढले असल्याने हवेतील प्रदूषकांत वाढ झाली असावी, असा अंदाज अभ्यासकांनी वर्तविला आहे.
शहरातील हवाप्रदूषणाची मुख्यकारणे
* वाहनांमधून होणारे उत्सर्जन
* ढगाळ हवामान
* धूळ
* औद्योगिक उत्सर्जन