न्यूयॉर्क – यावर्षी अतिशय अपायकारक ग्रहस्थिती संपूर्ण जगाने अनुभवली आहे. आता अतिशय दुर्मिळ ग्रहस्थितीचा अनुभव आज संपूर्ण जगाने घेतला. 21 डिसेंबर हा दिवस संपूर्ण वर्षातील सर्वात छोटा दिवस आणि सर्वात मोठ्या रात्रीचा आहे. त्याचबरोबर अवकाशामध्ये कधी नव्हे ते गुरू आणि शनि हे दोन ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ आल्याचे दृश्य खगोलप्रेमींनी अनुभवले.
जवळपास चार दशकांमध्ये अशी स्थिती क्वचितच येते, असे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था “नासा’ ने म्हटले आहे. या दोन्ही ग्रहांमधील नेहमीच्या अंतरापेक्षा आजचे अंतर एक दशांश कमी झाले आहे.
खगोलशास्त्रीय भाषेत सांगायचे तर पौर्णिमेचा चंद्र ज्या प्रमाणे पृथ्वीच्या जवळ जितक्या अंतरावर असतो, त्या अंतरापेक्षा एकपंचमांश प्रमाणात हे अंतर आहे. गुरू आणि शनिची ही युती दृश्य स्वरूपात असल्याचे, खगोलतज्ज्ञांनी म्हटले आहे. गुरू आणि शनि दरम्यानचे अंतर 450 दशल मैल (730 दशलक्ष किलोमीटर) पेक्षा अधिक आहे.
गुरूपासून पृथ्वीचे अंतर 550 दशलक्ष मैल (890 दशलक्ष किलोमीटर) इतके आहे. गुरू आणि शनिच्या युतीमुळे अवकाशात बायबलमध्ये उल्लेख असल्याप्रमाणे “स्टार ऑफ बेथलेम’ अथवा खिसमस स्टार सारखा एकच प्रखर तारा चमकत असल्यासारखे दिसले. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्यावेळी पूर्वदिशेला असा तारा चमकत असल्यासारखा उल्लेख बायबलमध्ये आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून अवकाशात ग्रह दक्षिणेकडे-दक्षिणपूर्वेकडे एकत्र येऊ लागल्यासारखे दिसते आहे. त्यातील पृथ्वीच्या अधिक जवळ असलेला गुरू अधिक तेजस्वी दिसतो आहे. त्याच्या उजव्या बाजूस वरच्या दिशेला आकाराने किंचित लहान शनिही दिसतो आहे.
दोन ग्रहांची अशाप्रकारची युती आपल्या सूर्यमालेमध्ये काही नवीन नाही. सूर्याभोवती फिरत असताना गुरू अशाप्रकारे शनिच्या जवळून जातो. ही ग्रहस्थिती दर 20 वर्षांनी येते असे खगोलतज्ज्ञांनी म्हटले आहे. सोमवारी सूर्यास्तानंतर क्षितीजाजवळ ही युती दिसली. आणखी काही दिवस ही युती दिसू शकणार आहे.
1623 नंतर प्रथमच हे दोन्ही ग्रह इतक्या जवळ आले आहेत. मात्र त्यावेळी सूर्याच्या खूप जवळ असल्यामुळे ही युती बघितली गेल्याची नोंद नाही. त्यापूर्वी 1226 साली चेंगीजखान आशियावर स्वारी करत असताना अशी युती आढळली गेली होती. मात्र आजची युती टेलिस्कोपशिवायही दिसू शकेल आणि या ग्रहांचे उपग्रह, चंद्रही दिसू शकले.