मल्हारपेठ -करोनाच्या पार्श्वभूमीवर अडूळजवळील काळेवाडी गावात पाटणच्या पुरवठा विभागाने माहे जून महिन्याचे आगाऊ धान्य मे महिन्यात वितरीत केले. त्यामुळे ना. शंभूराज देसाई यांनी त्यांच कौतुक केले. काळेवाडी गावात करोना बाधित रुग्ण सापडताच प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव यांनी त्वरित गावाला भेट देवून ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या खबरदारी घेणे आवश्यक आहे. याबाबत मार्गदर्शन केले.
भेटीदरम्यान ग्रामस्थांनी जून महिन्याचा धान्य कोठा उपलब्ध करून मिळावा, अशी विनंती केली होती. त्या अनुषंगाने पुरवठा विभागाने अडूळ ता. पाटण येथील स्वस्त धान्य दुकानदार विजय शिर्के यांच्यामार्फत नुकतीच काळेवाडी गावास सर्व योजनांचे एकत्रित धान्य वितरित केले. धान्य वितरण सुरू असतानाच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी काळेवाडी गावास भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी आम्हांस जुनचे आगाऊ धान्य मिळाले असल्याबाबत सांगत समाधान व्यक्त केले.
विशेष म्हणजे स्वस्त धान्य दुकानदार विजय शिर्के यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धान्य उधारीवर दिले आहे, हे समजल्यावर गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी पुरवठा विभागाच्या या कामाचे कौतुकही केले.काळेवाडी गावास वेळेत आणि आर्थिक समस्या आड न आणता सामाजिक जबाबदारी म्हणून धान्य वितरण केलेल्या या सामाजिक कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.