महिला आठ दिवस होती व्हेंटिलेटरवर
पुणे – व्हेंटिलेटरवरून करोना रुग्ण मृत्यूलाही मात देत यशस्वीपणे ठणठणीत बरे होत असून सर्वांसाठीच ही सुखावह बाब आहे. यापूर्वी व्हेंटिलेटर लावण्यात आलेली व्यक्ती म्हणजे अखेरच्या घटका, असे समीकरण होते व ते काहीसे बरोबरही होते.
मात्र, गेल्या काही महिन्यात व्हेंटिलेटरवरील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे 70 ते 80 टक्के असून डॉक्टरांनी केलेले उपाय, अथक परीश्रम तसेच रुग्णाची इच्छाशक्ती याला कारणीभूत असल्याचे, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. दरम्यान, एक गंभीर अवस्थेतील करोनाबाधित ज्येष्ठ महिलेने तब्बल 31 दिवस लढत देत करोनावर विजय मिळवला.
यवत (ता. दौंड) येथील संगीता पांढरे, असे या महिलेचे नाव असून तब्बल 8 दिवस त्या व्हेंटिलेटरवर होत्या. जम्बो रुग्णालयातून या महिलेला नुकताच डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, जम्बो रुग्णालयातून करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 500 एवढी झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.