पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पालिका रुग्णालयातील बेडची क्षमता संपत आली आहे. त्यामुळे आज आयुक्त व गटनेत्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये आपल्या शहरातील जम्बो कोविड रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यांना पहिल्यांदा 200 बेड सुरू करण्याबाबत आदेश दिले आहेत, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
शहरातील वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज आयुक्त राजेश पाटील यांनी गटनेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीला महापौर माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, अतिक्ति आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे आदी उपस्थित होते.
यावेळी शहरातील वाढत्या रुग्णांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच रुग्णालयातील बेड अपुरे पडत असल्याने शहरातील जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला 200 बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यानंतर आवश्यकता भासल्यास आणखी बेड उपलब्ध केले जाणार आहेत. या ठिकाणी 800 बेडची क्षमता आहे. दोन महिन्यांसाठी 200 बेड उपलब्ध केले जाणार असल्याचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.