- मृतांच्या आकड्यात नेहमीच गोंधळ
- आज 1189 नवीन बाधित
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना विषाणूचा फैलाव होऊन एक वर्ष उलटले आहे. मात्र अजूनही पालिकेला करोना मृतांबाबत गांर्भीय नसल्याचे दिसत आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू होऊनही आठ-दहा दिवस पालिका प्रशासनाला त्याची खबर नसते. खासगी रुग्णालयांकडून मृत्युंची माहिती प्रशासनाला वेळेत मिळत नसल्याने नेहमीच गोधळ होत आहे. गेल्या संपूर्ण एक वर्षात महापालिकेचा वैद्यकीय विभाग खासगी रुग्णालयांना करोना मृत्यूबाबतचे गांभीर्य समजविण्यात अपयशी ठरला आहे. सोमवारी देखील पालिकेच्या प्रसिद्धी पत्रकात 16 मृत्यू दर्शविण्यात आले आणि खाली टिप देण्यात आली की, मागील 24 तासांमध्ये दोनच मृत्यू झाले आहेत. उर्वरित मृत्यू जुने आहेत, जे आज कळविण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोमवारी (दि. 22) 1189 नवीन रुग्णांची भर पडली. तर दिवसभरामध्ये 16 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या 24 तासांत मृत्यू झालेले 2 रुग्ण आहेत. तर उर्वरित मृत्यू हे आधीचे आहेत, ज्याची माहिती आज पालिकेला मिळाली. आजपर्यंत शहरातील 1 लाख 23 हजार 552 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 1187 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 2 रुग्णाची नोंद झाली. तसेच दिवसभरात 16 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहरातील 11 तर शहराबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे.
आज दिवसभरामध्ये 843 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 10 हजार 404 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 6109 संशयित रुग्ण तपासणीसाठी दाखल झाले. अद्याप 2110 संशयितांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 1883 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 9342 वर पोहचली आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 11,225 इतकी आहे. सोमवारी दिवसभरात 3710 जणांना करोनाची लस देण्यात आली. आतापर्यंतचा एकूण लसीकरणाचा आकडा 96149 इतका झाला आहे.
जिल्हा रुग्णालयात 34 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि. 22) 34 करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, 14 रुग्ण बरे होऊन घरी परतले. करोनाबाधित रुग्ण हे पिंपळे गुरव, जगताप डेअरी, औंध, औंध रस्ता, पुणे, खडकी, डांगे चौक-थेरगाव, येरवडा, जेजुरी, भवानी पेठ, जुनी सांगवी आदी परिसरातील आहेत. न्हावरी (ता. भोर), पिंपळे गुरव, वाकड, ताथवडे, जुनी सांगवी आदी परिसरातील आहेत. दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असताना 85 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला. त्यांना 12 तारखेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्याच दिवशी त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये आठवडाभर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा 20 तारखेला मृत्यू झाला.
रुग्णालयामध्ये सध्या 72 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 21 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील 3 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 878 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, 870 जणांना होम क्वॉरंटाइन केले आहे.