मुंबई – ठाण्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध काल नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 353, 307, 332, 506(2), 143, 148, 149, 120 (ब)सह आव्हाडांसह सात जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अश्यातच आता जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.
याप्रकरणी धमकीची ऑडिओ क्लिप स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिहार तुरुंगात जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मारण्याचे आदेश गुंड सुभाष सिंह ठाकूर उर्फ बाबाजीला दिल्याचं या ऑडिओ क्लिप मध्ये दिसत आहे.
सध्या ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, याप्रकरणी आव्हाड यांनी फेसबूक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या क्लिपमध्ये ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या देखील नावाचा उल्लेख असल्याचं समजत आहे.
आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात…
ज्या नताशाला मी तीच्या जन्मानंतर साधं बोटही कधी लावलं नाही. किंवा ओरडलोही नाही. तीच्याबद्दल एक व्यक्ती फिल्डींग लावून मारुन टाकेन हे बोलतो. तेव्हा प्रचंड राग येतो. अस्वस्थता येते. तुम्हीच मला सांगा एक राजकीय नेता म्हणून हे सगळं सहन करायचं. एक पिता म्हणून हे सगळं सहन करायचं. आणि भूमिका काय घ्यायची ? घाबरुन घरी बसायचं, का उघडपणाने मैदानात यायचं.
कोण आहे बाबाजी ? बाबाजी म्हणजे दाऊद इब्राहीमचा हस्तक. जे जे हत्या शुटआऊट मधील पहिल्या पाच जणांमधील एक आरोपी. स्वत:चं मुंबईमध्ये प्रचंड नाव असलेला. त्याच्या हस्तकांकरवी जावयाचा आणि मुलीचा मर्डर होणार. हे ऐकल्यानंतर एका बापाला काय वाटल असेल. राजकारण बाजूला ठेवा. पण, कधीतरी ह्या गोष्टीचा देखिल विचार करा…” असं जितेंद्र आव्हाड आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले आहेत.