नवी दिल्ली – खेळत्या भांडवलाच्या अभावामुळे काम थंडावलेले जेट एअरवेज चौथ्या तिमाहीचा ताळेबंद इतक्यात जाहीर करू शकणार नसल्याचे या कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या व्यवस्थापनात बदल होत आहेत. त्याचबरोबर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे सरलेल्या वर्षाचा आणि चौथ्या तिमाहीत ताळेबंद इतक्यात जाहीर करणे शक्य होणार नसल्याचे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
खेळत्या भांडवलाच्या अडचणी आल्यामुळे कंपनीचे कामकाज बंद पडले असून कंपनीला कर्ज देणाऱ्या बॅंकांनी या कंपनीचे भागभांडवल नव्या प्रवर्तकांना विकण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. सध्या या कंपनीच्या शेअरचा भाव साधारणपणे 150 रुपये प्रति शेअर या पातळीवर आहे. पगार आणि इतर कारणासाठी कंपनीचे कर्मचारी बऱ्याच दिवसापासून आंदोलन करीत आहेत.