गोंदवले -माण तालुक्यातील बिदाल येथे पाइपलाइनचे काम करण्यासाठी आलेल्या जेसीबीसह तरुण चालक विहिरीत पडल्याने चालकाचा गाळात रुतून बसल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ही घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. उन्हाळ्यामुळे पाइपलाइनचे काम सुरु करण्यासाठी बिदाल (ता. माण) येथील वैभव भरत मुळीक (वय, 25 वर्षे) हा जेसीबी मशीनसह विनायक जगदाळे यांच्या विहीरीवर आला. श्रीफळ वाढवून कामास सुरुवात करण्यात आली.
विनायक जगदाळे कुठून कशी पाइपलाइन न्यायची यासाठी फक्की टाकत होते. तर वैभवने जेसीबीच्या सहाय्याने विहीरीलगतची जागा साफ करण्यास सुरुवात केली. साफसफाई करत असताना वैभवचे जेसीबी मशीनवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मातीवरुन जेसीबी मशीन घसरुन वैभव मशीनसह थेट विहिरीतील पाण्यात पडला. काही कळण्याच्या आतच तब्बल पंचवीसपेक्षा जास्त फूट खोली असलेल्या पाण्यात वैभव जेसीबीसह बुडाला.