वडूज -मायणी येथील संस्थेची व सदस्यांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पाच जणांवर विविध कलमांसह वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच संस्थेशी निगडीत यापूर्वीच्या दाखल तक्रारीवरून आ. गोरे यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने व ते सध्या फरारी असल्याने तालुक्यात राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष जयकुमार गोरे, सचिव सोनिया जयकुमार गोरे, अरूण गोरे या शिक्षण संस्थेवर बेकायदेशीररित्या ठराव करुन घेऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आणले आहे. त्या अनुषंगाने उपस्थित वाद हा कोल्हापूरच्या धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट आहे. संस्थेचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोनिया जयकुमार गोरे, अरुण गोरे, सदस्या शैलेजा साळुंखे, सदस्या स्मिता कदम, सदस्य महमंद फारुक खान यांनी मायणी येथील संस्थेच्या मालकीची जमीन मिळकतीची नोंद कोल्हापूरच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात पीटीआर उताऱ्यास करून संस्थेस पीटीआर उतारा मिळण्याबाबतचे सर्व प्रकारचे कामकाज करण्याकामी संचालक अरूण गोरे यांची सर्वानुमते निवड करून तसा ठराव घेतला.
जयकुमार गोरे, अरुण गोरे यांनी आपसात संगनमत करुन छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या नावे मायणी येथे असणाऱ्या स्थावर मिळकती सार्वजनिक न्यास कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडे बदल अर्जाच्या अनुषंगाने दाखल केलेला होता. त्यांनीं मायणी येथील मिळकतीपैकी काही मिळकती संस्थेच्या सचिव सोनिया जयकुमार गोरे यांनी मिळकत सचिव म्हणून छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरचे नावे बक्षीसपत्र करुन घेतली होती. त्याप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष जयकुमार गोरे, सचिव सोनिया गोरे, खजिनदार अरुण गोरे, सदस्या शैलेजा साळुखे, सदस्या स्मिता कदम, सदस्य महमंद फारुक खान यांनी आपसात संगनमत करून या मिळकतीबाबतीत संस्थेच्या सभासदांना कोणतीही माहिती मिळू नये. तसेच मिळकतीबाबतीत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विल्हेवाट लावण्याच्या गैरउद्देशाने संस्थेची स्थावर मालमत्तेसंबधी जाहीर नोटीस एका दैनिकात प्रसिध्द केली होती.
संगनमत करून खोटी व बनावट जाहीर नोटीस प्रसिध्द केली आहे. तसा बनावट अंक कोठेतरी तयार करुन मूळ खरा अंक लपवून हा बनावट अंक कोल्हापूरच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल केला आहे. वृत्तपत्राचा मूळ अंक तसेच ऑनलाइन अंक या पानावरील मजकूर दाखल केलेल्या चौकशी जाहीर नोटीस व बनावट अंकातील मजकूर भिन्न असल्याचे दिसून आले.
म्हणून संबंधित दैनिकाकडील संपादकांकडे नोटीसीमार्फत मागविलेल्या खुलासामध्ये संबधित संपादकांनी हा अंक आम्ही छापलेला नाहीं किंवा तशी कोणतीही माहिती आमच्या कार्यालयाकडे दिली नव्हती असे लेखी कळविले आहे. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष जयकुमार भगवान गोरे, सोनिया जयकुमार गोरे, अरुण दादासो गोरे (सर्व रा. बोराटेवाडी ता. माण), शैलेजा अशोक साळुंखे, स्मिता विरेंद्र कदम, महमंद फारुक खान यांनी आपसात संगनमत करून संस्थेच्या हितसंबंध असणाऱ्या लोकांची फसवणूक केली असल्याची तक्रार वडूज पोलिस ठाण्यात आप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांनी दिली आहे. या तक्रारीवरून आमदार जयकुमार गोरे यांच्यासह सहा जणांवर वडूज पोलिस ठाण्यात विविध कलमांसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख तपास करीत आहेत.