जावडेकर यांनी ‘सेल्फी विथ सॅपलिंग’ मोहिमेचा केला प्रारंभ

नवी दिल्ली – केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज “सेल्फी विथ सॅपलिंग’ या जनमोहिमेचा प्रारंभ केला. एक रोपटं लावून त्यासमवेत आपला सेल्फी समाज माध्यमावर पोस्ट करत सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पर्यावरणविषयक मुद्दे हाताळताना जन भागीदारी हा अविभाज्य भाग असून पर्यावरण रक्षणाला जन चळवळीचे स्वरुप प्राप्त व्हायला हवे यावर जावडेकर यांनी भर दिला. जागतिक पर्यावरण दिनी प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव आणि सिनेअभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासमवेत नवी दिल्लीतल्या पर्यावरण भवनाच्या आवारात वृक्षारोपण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नवीकरणीय ऊर्जा स्रोत, हरीत तंत्रज्ञानाच्या शोधासाठी सरकार, उद्योगजगत, समाज आणि व्यक्तींनी एकत्र यावे आणि शहरं, जगभरातल्या प्रातांमधली हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन जावडेकर यांनी केले.
पर्यावरणाप्रती सजगता दाखवत पर्यावरण जतनाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. वायु प्रदूषण ही यावर्षीची संकल्पना आहे.

जगभरातल्या सुमारे 92 टक्के लोकांना श्वासोच्छ्वासासाठी स्वच्छ हवा मिळू शकत नाही. वायु प्रदुषणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला दरवर्षी 5 ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्सचा फटका सहन करावा लागतो. ओझोन प्रदुषणामुळे 2030 पर्यंत मुख्य पिकांची उत्पादकता 26 टक्क्‌यांनी घटण्याची शक्‍यता आहे.
भारताने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम, एनसीएपी आखला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.