“प्रकाशदीप’ महावितरणच्या मंडळ कार्यालयात करणार मार्गदर्शन
नगर: महावितरणच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी शुक्रवारी (दि.7) रोजी मार्गदर्शनपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. काम मिळविण्यासाठी आवश्यक परवाना काढण्याबाबत मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी सांगितले आहे.
शासकीय धोरणानुसार महावितरण सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने काम देऊन रोजगार उपलब्ध करून देते. विद्युत निरिक्षकांकडून परवाना प्राप्त इलेक्ट्रिक व मेकॅनिकलमधील पदवी, पदविका प्राप्त बेरोजगार अभियंत्यांना रोजगाराची ही संधी दिली जाते. या संधीविषयी अधिकाधिक बेरोजगार अभियंत्यांना माहिती मिळावी तसेच परवाना काढण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी महावितरणकडून मेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्टेशन रस्त्यावरील “प्रकाशदीप’ या महावितरणच्या मंडळ कार्यालयात शुक्रवारी आयोजित मेळाव्याला संबंधित सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.