जम्मू – जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) एका पोलीस उपअधीक्षकाला दहशतवाद्यांशी (terrorists) संबंध ठेवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक न्यायालयाने वॉरंट जारी केल्यानंतर ही अटक करण्यात आली.
शेख आदिल मुश्ताक (Deputy Superintendent of Police Sheikh Adil Mushtaq) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपअधीक्षकाचे नाव आहे. त्याच्यावर मुझम्मिल जहूर नावाच्या एका दहशतवाद्याला अटक टाळण्यास मदत केल्याचा आणि त्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
शेख आदिलला नौगाम पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच अटक केली. भ्रष्टाचारासह अनेक आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला श्रीनगरमधील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
जुलैमध्ये अटक करण्यात आलेल्या मुझम्मिल जहूरचे फोनकॉल रेकॉर्ड तपासले असता, आदिल मुश्ताक या पोलिसाला त्या दहशतवाद्याने सतत संपर्क साधल्याचे स्पष्ट झाले. आदिलने मुझम्मिल जहूरला कायद्यातून पळवाट काढण्याचा मार्गही सांगितला होता. आदिल मुश्ताक हा मुझम्मिल जहूरशी टेलिग्राम ऍपवर संवाद आणि चॅट करायचा. जहूर आणि आदिल यांच्यात किमान 40 कॉल्स झाले आहेत.
तांत्रिक पुरावे आणि पैशाच्या व्यवहाराच्या आधारे पोलिसांनी आदिल मुश्ताकविरोधात भक्कम केस उभी करण्यात आली आहे. आदिलने टेरर फंडिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्यालाही यात गोवण्याचा प्रयत्न केला होता. उपतपास अधिकाऱ्याला टेरर फंडिंग प्रकरणात अडकवण्यासाठी दहशतवादी आरोपीच्या वतीने आदिल मुश्ताकने खोटी तक्रारही तयार केली होती. यामध्ये तीन आरोपींना फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती आणि एकजण पळून गेला होता.
आदिल मुश्ताकने आरोपींकडून 5 लाख रुपये घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तो मुझम्मिल जहूरच्या जवळच्या संपर्कात होता. मुझम्मिल जहूरने एलईटीचे आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून सोपोरमध्ये बॅंक खाते उघडले होते.