नवी दिल्ली : जम्मू- काश्मीर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आले असल्याचे दिसत आहे. कारण आज जम्मूचे विमानतळ दोन स्फोटांनी हादरले आहे. भारतीय हवाई दलाच्या तांत्रिक विभागात हे दोन स्फोट झाले आहेत. कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही झालेल्या या स्फोटांमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
जम्मू विमानतळावर करण्यात आलेल्या या स्फोटात कोणीही जखमी किंवा कोणतेही नुकसान झाले नसल्याचे भारतीय हवाई दलाकडून सांगण्यात आले आहे. ड्रोनच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला असून दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
Damage caused due to explosions by the drones at the Jammu airbase at 1.27am and 1.32 am today. Initial inputs suggest that shaped charge (explosive device) used for the explosions: Sources pic.twitter.com/53euEdNpfD
— ANI (@ANI) June 27, 2021
रविवारी पाच मिनिटांच्या अंतरावर हे दोन स्फोट झाले आहेत. रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी पहिला तर १ वाजून ४२ मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. स्फोटामध्ये इमारतीच्या छपराचा भाग कोसळला आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ड्रोनच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला असून यासाठी स्फोटक उपकरणाची मदत घेण्यात आली.
भारतीय हवाई दलाने ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी सकाळी जम्मू एअर फोर्स स्टेशनमध्ये दोन कमी तीव्रतेचे स्फोट झाले. एकामुळे इमारतीच्या छताचे नुकसान झाले असून दुसरा मोकळ्या परिसरात पडला. स्फोटात कोणतेही नुकसान झालेले नाही. याप्रकरणी स्थानिक यंत्रणांसोबत तपास सुरु आहे”.
स्फोटानंतर काही वेळातच संपूर्ण परिसर सील करण्यात आला. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम सध्या घटनास्थळी असून स्फोटांचं मुख्य कारण शोधत आहेत. दरम्यान स्फोटांची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.