नगर – जामखेड शहरातील एसबीआय बॅंकेजवळील गट नं. 923 मधील 24 गुंठे जागा विकत घेतली असतानाही ती जागा मोकळा भूखंड म्हणून दाखविणारा खोटा नकाशा नगरपालिकेत सादर करून त्या आधारे गृह प्रकल्पासाठीचा लेआऊट मंजूर करून घेऊन भूमी अभिलेख, नगररचना कार्यालय, नगरपालिकेसह जागामालकाची फसवणूक करणाऱ्या जामखेडमधील 11 उद्योजकांच्या आता मुसक्या आवळण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.
याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दैनिक “प्रभात’ने खोटा नकाशा देऊन लेआऊटला मंजुरी या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जामखेड शहरात चांगलीच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेऊन नगरपालिकेसह पोलिसांनी आता तपासाला वेग आणला आहे.
जामखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक यांना पत्र पाठवून सादर करण्यात आलेल्या दोन मोजणी नकाशाची सत्यता पडताळणी करून नगरपालिकेला आपला अभिप्राय तातडीने कळविण्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे भूमी अभिलेख कार्यालयानेच संबंधित तक्रारदार विवेक काकासाहेब नेटके यांना नगरपालिकेला देण्यात आलेले दोन नकाशा या कार्यालयाने दिले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गट नं. 923 मधील भूखंडाच्या प्रकरणावरून फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे दिसते.
भूमी अभिलेख कार्यालयाकडील मोजणी रजिस्टर क्रमाकांचा मूळ नकाशा सादर न करता बनावट पावतीच्या आधारे नकाशा तयार करून तो नगररचना कार्यालयात दाखल करून जामखेड नगरपालिकेकडून त्या जागेच्या लेआऊटला मंजुरी मिळली. या प्रकरणी नगररचना कार्यालयासह भूमी अभिलेख, नगरपालिका व संबंधित जागामालकाची फसवणूक केल्याची फिर्याद विवेक काकासाहेब नेटके यांनी दाखल केल्याने जामखेड पोलीस ठाण्यात दिलीप हरकचंद गुगळे, सुनील मनसुखलाल कोठारी, प्रमोद धनराज बोगावत, तात्याराम रोहिदास पोकळे, सागर गुरुलिंग मिटकरी, अनंत विलास चिंतामणी, अमोल विलास चिंतामणी, कीर्ती अमोल चिंतामणी, शीला अनंत चिंतामणी, संतोष पोपटलाल फिरोदिया, सौरभ नामदेव शिंदे या अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
“आयकॉनसिटी’ गृह प्रकल्प अडचणीत
नगरपालिकेने भूमी अभिलेख कार्यालयास अभिप्राय मागितला आहे. याबाबत दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जामखेड येथील नगरपालिका हद्दीतील गट नें. 923 मध्ये चालू असलेला आयकॉन सिटी या गृह प्रकल्पाचे रेखांकन अंतिम मंजुरी आदेश व लेआऊट मो. र. नंबर 1078/2016 चा खोटा व बनावट नकाशा तयार करून शासनाची फसवणूक केल्याबाबत, तसेच हा लेआऊट रद्द करण्याबाबत नगरपालिकेकडे तक्रार अर्ज आला आहे. तरी या नगरपालिकेकडे मो. र. नंबर 1078/2016 चा सादर केलेल्या दोन मोजणी नकाशाची सत्यता पडताळणी करून अभिप्राय द्यावा, असे पत्र मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिले आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी संबंधित विभागांकडून ती कागदपत्रे मिळविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे तपास करीत असून, लवकरच कागदपत्रांची तपासणी करून अशा प्रकारे फसवणूक झाली हे पाहून तसेच पुरावे जमा करण्यात येतील. हे पुरावे मिळाल्यानंतर ज्यांच्या विरोधात तक्रार आली आहे, त्या सर्वांना अटक केली जाईल.
– संभाजी गायकवाड,पोलीस निरीक्षक, जामखेड