पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेपुढे मंकी पॉक्स या नव्या संसर्गजन्य आजाराचे आव्हान समोर उभे राहिले आहे. अद्याप राज्यात कुठेही मंकीपॉक्सचा रुग्ण सापडला नसला तरी संभाव्य धोका लक्षात घेत परदेश आणि केरळमधून येणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
केरळ राज्यात मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आणि दिल्लीत एक रुग्ण आढळून आला. करोनाचे अनुभव लक्षात घेता, सर्व आरोग्य यंत्रणांना केरळ आणि परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना महापालिकेने वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या नागरिकांची माहिती नागरी आरोग्य केंद्रांमार्फत गोळा केली जाणार आहे.
व्हायरल इन्फेक्शनमुळे घरोघरी तापाचे रुग्ण असल्यामुळे नागरिकांना किमान मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत, याची माहिती असावी याकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांना जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दवाखान्यांमध्ये येणाऱ्या एखाद्या रुग्णामध्ये लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करण्याचे आदेश महापालिकेने डॉक्टरांना दिले आहेत.
काय आहेत लक्षणे
अंग भरून ताप येणे, डोके व अंगदुखी, घसा खवखवणे, खोकला येणे, प्रचंड थकवा जाणवणे, कानामागे, काखेत सूज येणे, अंगावर लाल रॅश येणे, अंगावर पुरळ येण्यापासून ते त्वचेवरील फोडांवर खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे बरे होण्यापर्यंत रुग्ण बाधित असू शकतो. मंकी पॉक्सची लागण झाल्यानंतर 6 ते 13 आणि 5 ते 21 दिवसांमध्ये उपचाराचा कालावधी आहे.
तापाला सहजपणे घेऊ नका
पावसाळी वातावरणामुळे बहुतांश घरांमध्ये ताप, सर्दी, खोकला आणि डोकेदुखीचे रुग्ण सापडत आहेत. संसर्गजन्य आजार म्हणून या सर्व त्रासाकडे पाहिले जाते. करोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे आलेल्या तापाला साधा ताप समजू नये. ताप जात नसल्यास वैद्यकीय चाचण्या कराव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे.
मंकी पॉक्सचे रुग्ण केरळ आणि दिल्लीत सापडले आहे. त्याची लक्षणे वेगळी आहेत. मंकी पॉक्सला ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. केरळमधून आलेल्या आणि परदेशवारी केलेल्या नागरिकांची पडताळणी केली जात आहे. लोकांना लक्षणे ओळखता यावीत, याकरिता जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.
डॉ. पवन साळवी, अतिरिक्त वैद्यकिय अधिकारी