जळगाव – जवानाच्या दुचाकीला एका वाहनाने कट मारल्यामुळे अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात जवान गंभीर जखमी झाला होता. त्यानंंतर उपचारादरम्यान आज या जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील वाघरे तालुका पारोळा येथे घडली आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
नंदू संजय पाटील, वय 30 असे अपघात मृत्यू झालेल्या जवानाचे नाव असून ते टेहू, तालुका पारोळा येथील रहिवासी होते. पाटील हे गेल्या दहा वर्षापासून सैन्य दलात असून ते सुट्टीवर आपल्या गावी आले होते.
8 डिसेबर रोजी पाटील हे सुट्टीवर गावी आले होते. दुसऱ्या दिवसी म्हणजे 9 डिसेंबर रोजी ते वाघरे तालुका पारोळा येथे एका नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्त दुचाकीने जात होते. टेहु ते वाघरे दरम्यान रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या दुचाकिला एका वाहनाने कट मारला त्यामुळे पाटील यांचा तोल गेला व ते खाली पडले. दुचाकीसह खाली पडल्यामुळे पाटील गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना धुळ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन व चार वर्षाचे दोन मुले आहेत. तसेच एक अविवाहित भाऊ असून ते देखील आर्मीमध्ये नोकरीला आहे. त्यांच्यावर आज टेहू ता.पारोळा येथील शासकीय इतमात अंत्यसंस्कार होणार आहे.