लंडन – जगप्रसिद्ध वेम्बली स्टेडियमवर अत्यंत रेमहर्षक ठरलेल्या लढतीत इटलीने पेनल्टी शुटआऊटमध्ये 3-2 अशी मात करत जागतिक फुटबॉलमधील मानाची युरो करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकली.
चाहत्यांना पेनल्टी शूटआऊटचा थरार पाहायला मिळाला. स्पर्धेतील सर्वात जलद गोल करत थाटात सुरुवात करणाऱ्या इंग्लंडला नंतर मात्र, वर्चस्व राखण्यात अपयश आले. पहिल्या हाफमध्ये इंग्लंडने तर, दुसऱ्या हाफमध्ये इटलीने गोल केला. पूर्ण वेळेत 1-1 अशी बरोबरी झाली. त्यानंतर 30 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही सामन्याचा निकाल लागला नाही. त्यानंतर पेनल्टी शुटआऊटमध्ये सामना निकाली झाला. त्यात जेडन सॅंचो, साका आणि रॅशफोर्ड हे खेळाडू इंग्लंडसाठी गोल करण्यात अपयशी ठरले. जवळपास पाच दशकांचा दुष्काळ संपवण्याचे इंग्लंडचे स्वप्न हे धुळीस मिळाले.
पेनल्टी शुटआऊटमध्ये इटलीच्या डॉमनिको बेरार्डीने पहिला गोल केला. त्यानंतर इंग्लंडच्या हॅरी केनने गोल करत बरोबरी केली. त्यानंतर इटलीच्या अँड्रिया बेलोट्टीला गोल करता आला नाही. त्यानंतर इंग्लंडच्या हॅरी मग्युरेने गोल करत 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर इटलीच्या लेओनार्डोने गोल करत 2-2 अशी बरोबरी केली. दुसरा गोल हुकल्याने इटलीवर दडपण आले. त्यानंतर इंग्लंडच्या मार्कस रॅशफोर्डला गोल करण्यात अपयश आले.
फेडेरिकोने गोल करत इटलीला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आलेला जॅडॉन सॅंचोही इंग्लडला बरोबरी साधून देण्यास अपयशी ठरला. इटलीच्या जॉर्जिओदेखील गोल करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे पाच गोलचा पेनल्टी शूट बरोबरी सुटेल अशी चिन्हे दिसू लागली. मात्र, इंग्लंडचे खेळाडू सलग तीन गोल करण्यात अपयशी ठरले. इंग्लंडच्या बुकायो साकाही गोल करण्यात अपयशी ठरला आणि इटलीने पेनल्टी शुटआऊटमध्ये सामना 3-2 ने जिंकला.
सामन्यात पहिल्या सत्रापासून इंग्लंडची आक्रमक खेळी पाहायला मिळाली. सामना सुरु झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्या मिनिटाला इंग्लंडच्या ल्यूक शॉने गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 67 व्या मिनिटाला इटलीचा खेळाडू लिओनार्डो बोनच्चीने गोल करत इंग्लंडशी बरोबरी केली. दोन्ही संघांना 90 मिनिटांच्या खेळात विजयी गोल करता आला नाही. त्यामुळे 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. मात्र तिथेही दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. अखेर सामन्याचा निर्णय पेनल्टी शुटआउटमध्ये गेला आणि इटलीने सामना जिंकला.
इटलीचे संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व
या स्पर्धेत इटलीने एकही सामना गमावला नाही. साखळी फेरीत इटलीने तुर्की, स्वित्झर्लंड आणि वेल्सला पराभूत करत बाद फेरी गाठली. या फेरीत ऑस्ट्रियाचा 2-1 असा पराभव केला होता. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमवर 2-1 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली. या फेरीत पेनल्टी शूटआउटमध्ये इटलीने स्पेनचा 4-2 ने पराभव केला.