लंडन – विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवल्यानंतर आता सर्बियाचा अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीचला गोल्डन ग्रॅंडस्लॅमचे सुवर्णपदक खुणावत आहे.
चारही ग्रॅंडस्लॅमसह ऑलिम्पिक टेनिसचे सुवर्णपदक जिंकण्याला गोल्डन ग्रॅंडस्लॅम असे संबोधले जाते. पुढील आठवड्यापासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे व त्यात जोकोवीचला या अनोख्या कामगिरीची संधी आहे.
जोकोवीचने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत इटलीच्या माटेओ बेरेट्टीनीवर मात करत कारकिर्दीतील 20 वे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद नोंदवले. कारकीर्दीत सहाव्यांदा विम्बल्डन जिंकणाऱ्या जोकोवीचला यंदा गोल्डन स्लॅम मिळवण्याची संधी आहे.
जोकोवीचने यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि विम्बल्डन या स्पर्धा जिंकल्या असून, त्याने ऑलिम्पिक व अमेरिकन स्पर्धा जिंकल्या तर नव्या इतिहासाची नोंद होईल.