लंडन -युरो कप 2021 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी इटली आणि स्पेन एकमेकांना भिडले. या सामन्याकडे जगभरातील फुटबॉलप्रेमींचे डोळे टिकून होते. तथापि, रोमांचक सामन्यात इटलीने स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
लंडनच्या वेम्बली स्टेडियम येथे रंगलेल्या हा सामना अतिरिक्तवेळेत 1-1ने बरोबरीत सुटला. यानंतर सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटने घेण्यात आला. इटली अंतिम सामन्यात पोहोचली असून, आता त्याचा सामना डेन्मार्क विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या उपांत्य सामन्याच्या विजयी संघाशी होणार आहे.
पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले होते. मात्र, दुसऱ्या सत्रात इटलीने आक्रमक खेळी करत 60 व्या मिनिटाला गोल झळकावला. इटलीच्या इमोबिलनं पास केलेला बॉल फेडरिको चिसानं गोलमध्ये रूपांतरित केला. त्यानंतर स्पेनच्या संघावर दडपण आलं.
हे दडपण कमी करण्यासाठी स्पेनच्या खेळाडूंची धडपड सुरू होती. स्पेनच्या खेळाडूंना 80 व्या मिनिटाला यश आलं. स्पेनच्या डी ओएलमोने पास केलेला बॉल अलवारो मोराटाने गोलमध्ये मारला आणि बरोबरी साधली.
अटीतटीच्या सामन्यात अखेर इटलीने रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याचे तिकीट निश्चित केले. इटलीसाठी जोर्गीन्होने निर्णायक पेनल्टी गोल केला. मॅन्युएल लोकेटेली आणि डॅनी ओल्मो अनुक्रमे इटली आणि स्पेनकडून सलामीचा गोल करण्याची संधी गमावली.
त्यानंतर ऍन्ड्रिया बेलोट्टीने शूटआऊटमध्ये इटलीला आघाडी मिळवून दिली. स्पेनकडून जेरार्ड मोरेनो आणि थियागो अलकंटाराने गोल केले, पण डोन्नारुम्मा गोल करण्यात अपयशी ठरला.
डेन्मार्क-इंग्लंडमध्ये दुसरी लढत
युरो कप 2021 स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यात रंगणार आहे. तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे दोन्ही संघ युरो कपचा उपांत्य सामना खेळणार आहेत. उपांत्य फेरीचा घाट चढून अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील.
गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या इंग्लंडने गटात अग्रस्थान मिळवून दिमाखात बाद फेरी गाठली. त्यानंतर उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनी आणि उपांत्यपूर्व सामन्यात युक्रेनचा धुव्वा उडवला.
यंदा सुरुवातीपासूनच त्यांना चाहत्यांचा उदंड प्रतिसाद लाभत असून, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळून प्रथमच अंतिम फेरीत धडक मारण्याची सुवर्णसंधी त्यांच्याकडे आहे.