पुणे -करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि तेही लहान मुलांच्या काळजीसाठी राज्याच्या “टास्कफोर्स’तर्फे खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या लहानमुलांच्या डॉक्टरांचा डाटा गोळा करण्यास सुरूवात करण्यात आली असून, सुमारे साडेतीन ते साडेचार हजार डॉक्टर यामध्ये सहभागी होऊ शकतील, अशी शक्यता आहे.
ज्या खासगी प्रॅक्टीशनर्सचे स्वत:चे रुग्णालय आहे, त्यामध्ये सगळ्या सोयी आहेत, किंवा स्वत:चे क्लिनिक आहे आणि ते दुसरीकडे जाऊन रुग्ण तपासू शकतात, अशा डॉक्टरांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
“महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’च्या माध्यमातून एक “गुगल फॉर्म’ या सगळ्या डॉक्टरांना पाठवण्यात आला आहे. त्यामध्ये कोणत्या प्रकारचे काम आहे, त्यांच्या रुग्णालयात कोणत्या सुविधा आहेत, दुसरीकडे जाऊन, व्हिजीट करून रुग्ण तपासण्याला हरकत नाही ना, सरकारला कशाप्रकारे मदत करू शकाल, असे विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत.
या माध्यमातून हा टास्कफोर्स तळागाळापर्यंत अधिक मजबूत करणार असून, लहानमुलांसाठी धोकादायक ठरणारा संभाव्य लाटेचा सामना पूर्ण तयारीने करू शकू, अशा आशावाद टास्कफोर्सच्या सदस्या आणि ससूनमधील बालरोग विभागाच्या प्रमुख प्रो. डॉ. आरती किणीकर यांनी व्यक्त केला आहे.