बाळांमध्ये वाढीचे टप्पे गाठण्यास होणार उशीर; वाचा सविस्तर बातमी…

पुणे – डॉक्‍टर्स आणि नर्सेस वाढीविषयक पूर्वतपासण्या वापरून बालके योग्य वेळेत योग्य गोष्टी शिकत आहेत की याबाबत अंदाज बांधू शकतात. यात पालकांशी चर्चा करून त्यांची मते विचारणे, बालकांच्या वागणुकीचे, लकबींचे, हालचालींचे, बोलण्याचे निरीक्षण करणे या पद्धतींचा समावेश होतो.

बालकांची वाढ आणि विकास यामध्ये वयानुसार बदलणाऱ्या अनेक क्रिया-प्रतिक्रिया आणि प्रतिसादांचा समावेश होतो. बालके त्यांच्या वाढीचे वेगवेगळे टप्पे त्यांच्या-त्यांच्या वेगाने गाठत असतात. वेगवेगळ्या बालकांमध्ये या वेगात बरीच तफावत असू शकते जी अगदी नॉर्मल समजली जाते. एखादा वाढीचा टप्पा गाठण्यास झालेला तात्पुरता उशीर हे फार काळजीचे कारण नसते. पण जर प्रत्येक वाढीचा टप्पा गाठायला उशीर होऊ लागला तर मात्र यात लक्ष घालावे लागते. वाढीचे टप्पे गाठण्यात झालेला उशीर पुढील आयुष्यावर देखील सौम्य अथवा तीव्र स्वरूपाचे परिणाम घडवू शकतो. 

यात मुख्यत्वे बोलण्यामध्ये, भाषेमध्ये, विचार करण्यामध्ये आणि मेंदूच्या काही क्षमता गाठण्यामध्ये येणारे अडथळे विचारात घेतले जातात. वाढीचे टप्पे गाठण्यात होणाऱ्या उशिरामागे अनेक कारणे असू शकतात – अनुवंशिकता, गरोदरपणातील काही अडचणी, वेळेआधी प्रसूती होणे (कमी दिवसाच्या बालकाचा जन्म) इ. पण बऱ्याचदा काही ठराविक कारण सापडेलच असे नाही. यामागे शरीरातील अतिशय क्‍लिष्ट घडामोडींचा हात असतो. पण या अडचणी लक्षात येताच त्यावर तत्काळ उपययोजना करणे, वाढीचे टप्पे गाठता यावेत म्हणून आणि बालकाने प्रौढावस्थेत योग्य प्रगती करत वाटचाल करावी म्हणून वेळीच पावले उचलणे महत्वाचे ठरते.

प्रत्येक बालकाने वाढीचे टप्पे गाठायची वेळ वेगवेगळी असली तरी ते गाठण्याची एक विशिष्ट कालमर्यादा असते. मेंदूच्या सूक्ष्म आणि स्थूल क्षमता गाठण्यात उशीर होणे, सूक्ष्म क्षमता म्हणजे वेगवेगळ्या क्रियांसाठी हाताच्या बोटांचा वापर करता येऊन लहान-सहान हालचाली करणे (उदा. हातात खडू अथवा खेळणे पकडणे). स्थूल क्षमता म्हणजे त्यामानाने मोठ्या प्रकारच्या हालचाली (उदा. उड्या मारणे, जिना चढणे, चेंडू फेकणे इ.).

बालकांची प्रगती वेगवेगळ्या वेगाने होत असली तरी सर्वसाधारणपणे तिसऱ्या महिन्यात बाळ मान धरायला सुरुवात करतात, सहाव्या महिन्यात बसतात, आणि दुसऱ्या वाढदिवसाच्या आधी चालायला लागतात. पाचव्या वर्षांपर्यंत मुले हवेत उंच बॉल फेकायला शिकतात आणि आधारासाठीची चाके लावून सायकल चालवू शकतात.

खालील काही लक्षणे बालकाची उशिराने होणारी वाढ आणि विकासाचे टप्पे गाठायला होणारा उशीर दर्शवू शकतात-
धड आणि अवयव लुळे पडणे
हाता-पायात ताठरता येणे
हाता-पायाच्या मर्यादित हालचाली
9 व्या महिन्यापर्यंत आधाराशिवाय बसता न येणे
ऐच्छिक हालचालींपेक्षा अनैच्छिक हालचालींचे वर्चस्व
एक वर्षापर्यंत आधार घेऊनसुद्धा पायावर वजन घेऊन उभे रहाता न येणे
बऱ्याचदा या कालमर्यादेपेक्षा होणारा उशीर सर्वसामान्य असू शकतो, पण अशावेळी एकदा तज्ज्ञांकडून तपासणी करून खात्री करून घेणे आवश्‍यक असते.
बोलणे व भाषिक कौशल्ये आत्मसात

करण्यास होणारा उशीर –
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन डेफनेस ऍण्ड अदर कम्युनिकेशन डिसॉर्डरनुसार, आपला मेंदू वयाच्या पहिल्या 3 वर्षांपर्यंत सर्वाधिक सक्रिय आणि ग्रहणक्षम असतो. या काळात मेंदूची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे हा काळ बोलणे व भाषा शिकण्यासाठी
सर्वोत्तम असतो. खरंतर बाळाच्या संवादाची सुरुवात जन्मतःच होते उदा. भूक लागली की रडणे. सहा महिन्याचे होईपर्यंत बाळे नेहमीच्या बोलीभाषेतील अनेक आवाज ओळखायला शिकतात. 12 ते 15 महिन्यांपर्यंत साधे सोप्पे शब्द अस्पष्टपणे का होईना, पण बोलायला शिकतात. 18 महियापर्यंत त्यांना काही शब्दांचे अर्थ कळू लागतात. 3 वर्षांचे होईपर्यंत मुलांना छोटी छोटी वाक्‍ये बोलायला येतात.
बोलणे आणि भाषिक कौशल्यातील उशीर

हा वेगवेगळ्या कारणांमुळे होतो-
बोलण्यासाठी स्वरयंत्र, जीभ, ओठ आणि जबडा यातील स्नायूंच्या हालचालींची सुसूत्रता लागते. अशा प्रकारे आवाज बाहेर काढण्यात येणारे अडथळे हे बोलण्यातील उशिरासाठी कारण ठरू शकतात. बोलण्यासंबंधी काही विकारांमध्ये (रीरुळर ेष ीशशलह) मुलांना अक्षरे एकत्र जोडून त्याचे शब्द बनविण्यात अडचणी येतात.
याउलट भाषिक कौशल्ये गाठण्यास होणारा उशीर हा समोरच्याचे बोलणे कळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे होऊ शकतो. अशी मुले आपले म्हणणे मांडण्यातही कमी पडतात. यात एखादी खूण करणे, हावभाव करणे आणि लिहिण्याचाही समावेश होऊ शकतो.
ऐकण्यातील अडथळे देखील बोलणे व भाषेतील अडचणींसाठी कारण ठरू शकतात. कानांची श्रवणचाचणी करून हे पडताळून पहाता येते.
बोलणे व भाषिक कौशल्ये आत्मसात करण्यास जर उशीर होत असेल तर यातील तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घ्यावा. वेळेत घेतलेले उपचार काही अडथळे दूर करण्यास मदत करू शकतात.

वाढीचे टप्पे गाठण्यास होणारा उशीर :
कारणे व धोक्‍याचे घटक
सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोल ऍण्ड प्रिव्हेन्शननुसार 3 ते 17 वर्षांमधील जवळपास 15% मुलांमध्ये वाढीचे टप्पे गाठण्यात एका बाबतीत तरी उशीर झालेला दिसून येतो. अनेकदा हे अडथळे जन्मापूर्वीच घडतात पण काही वेळा जन्मानंतरही जंतूसंसर्गामुळे, दुखापतीमुळे अथवा इतर काही कारणांमुळे घडू शकतात. अनेक घटक यास हातभार लावत असल्याने याचे एखादे विशिष्ट कारण सांगणे अवघड आहे. असे असले तरी काही जनुकीय आजार (डाऊन सिन्ड्रोम), गरोदरपण व बालवयातील जंतुसंसर्ग आणि वेळेआधी(कमी वयाचे) बाळ जन्माला येणे ही यामागची महत्त्वाची कारणे समजली जातात. ही कारणे “आईमधील कारणे’ आणि “बालकांमधील कारणे’ अशा दोन प्रकारांमध्ये विभागता येतात.

आईमधील कारणे:
आईमधील खालील कारणे बालकातील वाढीचे टप्पे गाठण्यामधील अडथळे ठरू शकतात. खालील कारणे असणाऱ्या सर्वच आयांच्या बाळांमध्ये अडचणी दिसत नाहीत, पण त्या येण्याची शक्‍यता मात्र जास्त असते. खालील कारणे नसतानादेखील काही आयांच्या मुलांमध्ये वाढीबाबत अडचणी असू शकतात.
आईचे शिक्षण 12 वी पेक्षा कमी असणे
गरोदरपणातील योग्य काळजी तिसऱ्या महिन्यानंतर घेणे
गरोदरपणात तंबाखूचे सेवन करणे
गरोदरपणात मद्यप्राशन करणे
काही वैद्यकीय कारणे (रक्तक्षय, अपुरा आहार, जंतूसंसर्ग, मधुमेह, उच्चरक्तदाब)
गरोदरपणात अथवा प्रसूतिदरम्यान काही गुंतागुंत होणे

बाळामधील कारणे:
बाळामधील खालील कारणे त्याच्या वाढीचे टप्पे गाठण्यामधील अडथळे ठरू शकतात. खालील कारणे असणाऱ्या सर्वच बाळांमध्ये अडचणी दिसत नाहीत, पण त्या येण्याची शक्‍यता मात्र जास्त असते. खालील कारणे नसतानादेखील काही बाळांमध्ये वाढीबाबत अडचणी असू शकतात.
37 आठवडे पूर्ण होण्याआधी जन्माला येणे
जन्मतः वजन 2500 ग्रॅमपेक्षा कमी असणे
स्कोअर (जन्मानंतर 5 मिनिटांनी) 7 पेक्षा कमी असणे (हा स्कोअर 0 ते 10 पर्यंत असून तो बाळाची शारीरिक परिस्थिती तपासण्यासाठी काढला जातो.)
जुळ्या अथवा तिळ्यांचा जन्म होणे
बाळात जन्मजात व्यंग असणे
बाळातील काही वैद्यकीय कारणे (रक्तक्षय)
बालकांची उशिराने होणारी वाढ ही इतर काही आजारांचे लक्षण असू शकते. उदा-
स्वमग्नता किंवा सेरेब्रल पाल्सी
फिटल अल्कोहोल स्पेक्‍ट्रम डिसॉर्डर
मायोपॅथी, मस्क्‍युलर डिस्ट्रॉफी
डाऊन सिन्ड्रोम सारखे काही अनुवंशिक आजार

बाळाची वाढ योग्य गतीने होत नाही अशी जर तुम्हाला शंका आली तर-
प्रत्येक मुलाचा वाढीचा वेग एकसारखा नसतो. त्यामुळे याचे निदान अतिशय काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावे लागते. कोणत्या प्रकारच्या वाढीचा दोष आहे त्यानुसार उपचारपद्धती बदलते. मेंदूच्या क्षमतांमधील सुधारणांसाठी वेगळे व्यायाम व उपचार असतात तर स्वमग्नता (सारख्या आजारांमध्ये स्वभाव व शिक्षणविषयक उपचार द्यावे लागतात. काही वेळा काही औषधांची मदत घ्यावी लागते. त्या त्या विषयातले तज्ज्ञ याविषयी अचूक उपचारपद्धती सुचवतात.
वाढीतील उशिराचे निदान करणे जरी अवघड असले तरी त्यासाठी विविध पद्धती आहेत. यात 2 प्रकार आहेत – वाढीविषयक पूर्वतपासण्या आणि वाढीविषयक मूल्यमापन.
याबाबतीतले निदान करण्यासाठी कोणत्याही रक्ततपासण्या नसल्यामुळे वरील पूर्वतपासण्या अतिशय महत्त्वाच्या ठरतात. जर या पूर्वतपासण्यांनुसार असे लक्षात आले की बाळाच्या वाढीचा वेग योग्य तितका नाही, तर वाढीविषयक मूल्यमापन करावे लागते.
वाढीविषयक मूल्यमापनामध्ये विविध तज्ज्ञांकडून बालकाच्या विविध कौशल्यांचा सखोल अभ्यास केला जातो. याच्या निष्कर्षांनुसार गरज पडल्यास पुढील काही तपासण्या व उपचार सुचवले जातात. एखाद्या बाबतीतच अडथळा जाणवल्यास त्या विषयातील तज्ञ त्याबाबत उपाययोजना करतात.

वाढीतील अडथळ्यांचे निदान व भविष्य
वाढीमध्ये कोणत्या प्रकारचा अडथळा आहे, किती प्रमाणात आहे आणि बाळापुढील आव्हाने कोणत्या प्रकारची आहेत यानुसार या बालकांची भविष्यातील प्रगतीचा अंदाज बांधता येतो. निदान लवकर झाल्याने व वेळेत उपचार घेतल्याने बालकाची प्रगती चांगली होऊ शकते. परिस्थिती पूर्वपदाला येणे जरी अवघड असले किंवा प्रगतीचा वेग जरी अतिशय कमी असला तरी बरीच मुले योग्य उपाययोजनेने काही काळात आपल्या समवयस्कांच्या बरोबरीने प्रगती करायला लागतात. काहींमध्ये मात्र प्रौढ वयात देखील काही अडचणी आणि अडथळे दिसू शकतात. अनेकजण दैनंदिन कार्यात स्वयंपूर्ण होतात तर काहींना सामाजिक व वैयक्तिक आधाराचीही गरज भासू शकते. क्वचित काहींमध्ये वाढीतील दोष बळावतात आणि मज्जासंस्थेस इजा पोहोचू शकते. अशांना जास्त मदतीची गरज भासते.

निष्कर्ष
बालकांच्या वाढीमध्ये अनेक अनुवंशिक व पर्यावरणीय घटकांचा हातभार असतो. यातील काही दोषांमुळे बालकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. काहीवेळा निरोगी आईवडील असताना, प्रसूतिदरम्यान योग्य काळजी घेतली असताना देखील बालकाच्या वाढीत काही दोष येऊ शकतात. वाढीतील दोषांचे नेमके कारण सांगणे जरी अवघड असले तरी आता यासाठी अनेक प्रभावी उपचारपद्धती अस्तित्वात आहेत.
वाढीतील दोषांचे जेवढे लवकर निदान होईल, तितकी बालकाची प्रौढ वयात चांगली प्रगती होण्यास हातभार लागेल!

डॉ. मानसी पाटील

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.