सांधेदुखीवर मसाजचा उपचार

आपल्या शरीराचा सांगाडा हा हाडांमुळे तयार होतो. शरीरातील दोन किंवा जास्त हाडे ज्या ठिकाणी जोडली जातात त्या भागाला सांधा म्हणतात. सांध्यामध्ये दोन प्रकारचे सांधे आहेत. त्यातील एका प्रकाराला चल सांधा व दुसऱ्यास अचल सांधा असे म्हणतात. ज्या सांध्यामुळे शरीराची हालचाल होते त्याला चल सांधे असे म्हणतात.

खांदा, कोपरा, मनगट, गुडघे या अवयवांत चल सांधे आहेत. या सांध्यामुळे शरीराची हालचाल करणे शक्‍य होते. तसेच डोक्‍याच्या कवटीचे सांधे अचल असतात. सांधेदुखीमध्ये सांध्या-सांध्यातील वात घटक दूषित होत जातो. तेव्हा शरीराच्या हालचाली करणे अवघड होते. हालचाली करू लागताच असह्य वेदना होऊ लागतात. यालाच आमविकार किंवा वातविकार किंवा संधिवात असे म्हणतात.

यामध्ये सांधे सुजतात व खूप दुखतात. संधिवाताची प्रमुख कारणे म्हणजे खूप कष्ट करणे, सतत जड वजन उचलणे, सारखे एका जागी बसणे, सारखे उभे रहाणे या व अशा अनेक कारणांमुळे संधिवात होतो. काहीवेळा तो हेरीडेटरीसुद्धा असतो. आंबट पदार्थ खाणे, अतिशय गार पेय पिणे यामुळे संधिवात होतो. ऍलोपॅथीच्या औषधांच्या परिणामामुळे सुद्धा संधिवात होतो.

सूज कमी करण्यासाठी कातेरी निगडी या पाल्याचा गरम पाण्यातून शेक द्यावा. वडाची पाने घेऊन त्यावर एरंडेल तेल लावून किंचित कोमट करून दुखत असलेल्या भागावर लावावीत अथवा त्याचे पोटीस बांधावे. सूज उतरल्यावर महानारायण तेलाने हळूवार हाताने घर्षण पद्धतीने गोलाकार पद्धतीने मसाज करावा. आहार समतोल ठेवावा. आंबट पदार्थ खाऊ नयेत. मादक पदार्थ अजिबात घेऊ नयेत. व्यायाम रोज करावा. गाऊट व ऱ्हुमॅटिझमसारखे जुने रोग मसाज केल्याने बरे होत नाहीत.

खेळाडूंच्या सांधेदुखीवर मसाजचा उपचार असा करा – वेगवेगळ्या क्षेत्रातल्या खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी मसाज करणे अत्यंत गरजेचे आहे. मसाज केल्यामुळे प्रकृती तंदुरुस्त राहून आपला खेळ उत्तमप्रकारे खेळून त्याचा दर्जा वाढवता येतो. खेळाडूंना मसाज करताना वेगवेगळ्या तेलाचा वापर करण्यात येत आहेत. त्यामध्ये मडीवाला तेल, मिथिल सिलीकेट, कैफर, टर्पेटाऊन, निलगिरी ही तेले चांगली आहेत. ह्या तेलांमुळे रक्त पातळ होऊन थांबलेले रक्त व रक्तप्रवाह व्यवस्थित चालण्यास मदत होते.

म्हणून हे तेल वापरली जातात. या तेलाच्या मसाजमुळे स्नायूंना बळकटी येऊन त्याच्या वेदना कमी होतात. स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी रॅलिस स्प्रे सुद्धा वापरला जातो. ऍक्‍युप्रेशरमुळे सुद्धा शरीराचे अवयव व स्नायू चांगले रहातात. मुख्यत्वे खेळाडूंचे वर्गीकरण व त्यानुसार व्यायाम ठरविला जातो.

खांद्याचे स्नायू मोकळे करणारी स्पंदन मसाज पद्धती – पोहोणारे, बॅडमिंटन खेळणारे, टेबल टेनिस खेळणारे यांच्या खांद्याचे स्नायूंचा सारखा वापर असल्यामुळे व खांद्याचे जॉइंटस्‌ मोकळे होण्यासाठी स्पंदन पद्धती या मसाजमुळे खांद्याचे विकार बरे होतात.

मांड्यांचे स्नायू हलके करणारी बुक्‍के मसाज पद्धत – हॉकी, फेंसिंग, टायक्‍वांदो, ऍथलेटस्‌ या प्रकारचा खेळ खेळणारे जे खेळाडू असतात त्यांच्या मांड्यांच्या स्नायूंच्या हालचाली जलदगतीने होत असल्यामुळे या स्नायूंना चापट्या किंवा बुक्‍के पद्धतीचा मसाज देणे गरजेचे असते. मसाजमुळे दुःख निवारण होऊन स्नायू ताजेतवाने होतात व दुखण्याचा त्रास कमी होतो.

पोटऱ्या व अग्रबाहूंचे स्नायूसाठी घर्षण पद्धतीचा मसाज – टेबल टेनिसपटू, जिम्नॅस्टिक, शूटर्स, लॉन टेनिस यांच्या पोटऱ्यांच्या आणि अग्रबाहूंच्या स्नायूंचा वापर जास्त प्रमाणात होतो. या स्नायूंची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व टिकविण्यासाठी घर्षण पद्धतीचा मसाज करावा.

गुडघ्याच्या तसेच सांध्याचे स्नायूंसाठी चक्रगती मसाज – जिम्नॅस्टक्‍स, लॉन टेनिस, टेबल टेनिस इ. खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना गुडघ्याचे स्नायू खूप प्रमाणात वापरावे लागतात. या स्नायूंना चक्रगती मसाज केल्याने हे स्नायू योग्य त्या ताण स्थितीत आणता येतात.

पाठीचा कण्यावर निडिंग अँड स्पंदन मसाज – निडिंग आणि स्पंदन पद्धतीचा मसाज हे वरदान असणारे ज्युडो, हॉकी खेळाडू, कुस्ती खेळणारे पहिलवान, पाण्यात बुड्या मारणारे, वॉटर पोलो खेळणारे, इत्यादी खेळाडू होत. या खेळाडूंच्या पाठीच्या कण्यावर पुष्कळ ताण पडत असल्यामुळे मणक्‍याचे सांधे दुखतात. निडिंग आणि स्पंदन पद्धतीचा मसाज दिल्यास त्यांना ते वरदान ठरेल.

मणक्‍यांचे विकार, संधिवात, स्नायू आजारांसाठी बस्ती व योगासनेफक्‍त मणक्‍याच्या विकारांसाठी नव्हे तर वाताच्या असंख्य विकारांमध्ये म्हणजे संधिवात, पक्षाघात स्नायूंच्या मांसपेशीचे आजार, पोटाचे आजार, तसेच खेळाडूंमध्ये विविध स्नायूंच्या मांसपेशींचे जे आजार उद्‌भवतात त्यांना पंचकर्मामधील बस्तीचा इलाज परिणामकारक ठरू शकतो.

कटीबस्ती –  औषधी तेल रुग्णावस्थेप्रमाणे ठरवून कंबरेवर ते तेल 30-45 मि. स्थिर करून ठेवणे.म्हणजेच कटीबस्ती कंबरेच्या विकारांवर उपयुक्‍त ठरते.

– सुजता गानू-टिकेकर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.