वारंवार नियमात बदल करणे अयोग्य

टोयोटोच्या व्यवस्थापकीय संचालकांची कैफियत 

नवी दिल्ली – भारतात वाहन क्षेत्रावर गरजेपेक्षा जास्त कर आहेत. त्याचबरोबर या क्षेत्रासंदर्भातील नियम वारंवार बदलले जात असल्यामुळे वाहन कंपन्यांना दीर्घ पल्ल्यात आपले धोरण तयार करता येत नाही, अशी खंत टोयोटो किर्लोस्कर मोटार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मासाकाझू योशिमुरा यांनी व्यक्‍त केले आहे. 

जर कर जास्त असतील तर वाहने महाग होतात. वाहने महाग झाल्यानंतर मागणी निर्माण होणार नाही. अशा परिस्थितीत आम्ही गुंतवणूक करून वाहननिर्मिती कशी करणार, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले की, भारत मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे भारताकडे आमचे लक्ष आहे. यासाठी भारतामध्ये आगामी काळात 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही करणार आहोत. मात्र, सरकारचे नियम हे सकारात्मक असले पाहिजे. भारतात इलेक्‍ट्रिक कार सादर करणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत भारतामध्ये या कार महाग पडतात. भारतातील ग्राहक चोखंदळ आहेत.

त्यामुळे अशी कार भारतात सध्याच्या परिस्थितीत सादर करून उपयोग होणार नाही. बऱ्याच वाहन कंपन्यांनी भारतामध्ये वाहनावर जास्त जीएसटी असल्याची तक्रार केलेली आहे. मात्र, गेल्या आठवड्यात अर्थमंत्रालयाने सांगितले की, भारतात वाहनावरील कर इतर देशांच्या तुलनेत योग्य पातळीवर आहेत. यामुळे या घट करण्याची गरज नाही.

होंडाची जीएसटी कमी करण्याची मागणी
भारतात मोटरसायकलवर जास्त जीएसटी आहे. तो कमी केला तरच सध्याच्या परिस्थितीत मोटरसायकलची मागणी वाढू शकेल, असे होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया या कंपनीचे संचालक यादविंदर गुलेरिया यांनी म्हटले आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे खरेतर लोकांना दुचाकी विकत घेण्याची इच्छा आहे. मात्र, जास्त करामुळे त्या महाग असतील तर ग्राहक दुचाकी कशा काय विकत घेतील, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.