-कौटुंबिक न्यायालयाकडून पत्नीचा घटस्फोट अर्ज मंजूर
-लग्नानंतर दहा महिने पतीने ठेवले नव्हते संबंध
-वयाचा विचार करता कायमस्वरूपी पोटगीचा आदेश
पुणे – वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध न ठेवणे क्रुरताच असल्याचे मत व्यक्त करत कौटुंबिक न्यायालयाने पत्नीने घटस्फोटासाठी केलेला अर्ज मंजूर केला. शारीरिक व्यंगावरून टोमणे मारणे आणि इतर कृत्याप्रमाणेच लैंगिक संबंध न ठेवणे हाही शारीरिक आणि मानसिक छळच असल्याचा असल्याचे न्यायलयाने स्पष्ट केले.
न्यायाधीश आर. एस. आराध्ये यांनी हा आदेश दिला आहे. दहा महिन्यांच्या वैवाहिक जीवनात पतीने लैंगिक संबंध ठेवलेच नव्हते. दरम्यान, लग्नाच्या वेळी दोघांचे वय 40 होते. पत्नी जरी उच्चशिक्षित आहे. तरीही तिला या वयात चांगली नोकरी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पतीने पगाराच्या एक चतुर्थांश रक्कम पत्नीला कायमस्वरूपी पोटगी म्हणून द्यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) यांचा विवाह 2015 मध्ये झाला. दोघेही उच्चशिक्षित आहेत. ती गृहिणी, तर तो बहुराष्ट्रीय कंपनीत आहे. विवाहानंतर हनिमुनला बाहेर गेल्यानंतर त्याने लैंगिक संबंध प्रस्थापित केले नाहीत. आपण मित्र-मैत्रिणीसारखे राहु, असे म्हणत तो शारीरिक संबंध टाळत असे.
त्यांचीशरीरयष्टी जाड होती. त्याबाबत तिला टोमणे मारण्यात येत असत. या त्रासाला कंटाळून तिने येथील कौटुंबिक न्यायालयात ऍड. खंडेराव टाचले आणि ऍड. मनिष मगर यांच्यामार्फत धाव घेतली. घटस्फोटाची मागणी केली. दरम्यान त्वचा रोग, पाय आणि पोट दुखण्यामुळे ती शारीरिक संबंधास नकार देत असल्याची बाजू पतीच्या वतीने मांडण्यात आली. वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर हे आजार बरे होऊ शकतात. मात्र, पतीच्या बाजूने असे केल्याचे दिसून येत नसल्याचाही निष्कर्ष न्यायालयाने काढला.
भारतीय संस्कृतीनुसार पती-पत्नीमध्ये लैंगिक संबंध नसतील तर लग्नाचा उद्देश साध्य होत नाही. या दाव्यात लग्नानंतर दहा महिने झाले तरीही पतीकडून लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यात आले नाहीत. याच बाबीवर घटस्फोट मागण्यात आला होता. तो कौटुंबिक न्यायालयाने मान्य केला.
ऍड. खंडेराव टाचले, अर्जदाराचे वकील.