पुणे – खराडी भागातील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील युवतींनी तोकडी वस्त्र परिधान केल्याने शेरेबाजी करून त्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन महिलांसह सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करण्यात आलेल्या दोन युवती परराज्यातील आहेत.
अलका किसन पठारे, शीतल कमलेश पठारे, सीमा बाळासाहेब पठारे, सचिन किसन पठारे, केतन बाळासाहेब पठारे, किरण सचिन पठारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ज्योती संजय येळे (रा. लेक्सीस सोसायटी, अनुसया पार्क, रक्षकनगर, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येळे यांची लेक्सीस सोसायटीत सदनिका आहे. माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करणाऱ्या दोन युवती येळे यांच्याकडे राहायला आहेत. त्यांच्याकडून येळे दरमहा भाडे घेतात.
याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी पठारे याच सोसायटीत राहायला आहे. येळे यांच्याकडे राहणाऱ्या युवती मूळच्या परराज्यातील आहेत. युवती सोसायटीच्या आवारात तोकडी वस्त्रे परिधान करून ये-जा करत असतात. त्याचा रहिवाशांना त्रास होत असल्याचा आरोप करत पठारे दोन दिवसांपूर्वी रात्री युवती राहत असलेल्या सदनिकेत शिरले. त्यांना शिवीगाळ केली. युवतींना चप्पलेने मारहाण केली तसेच येळे यांना धमकावले, असे येळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे तपास करत आहेत.