कोल्हापूर -शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत. तर प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आहेत, असे आपण वारंवार सांगत होतो. ते कालच्या घटनेवरून स्पष्ट झाले, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व शहराध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाई झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक तुरुंगात गेले. परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीने चौकशी केली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केली.
केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक नेत्यांवर कारवाया केल्या, त्यावेळी शरद पवार यांना पंतप्रधानांना भेटून हा अन्याय आहे व तो थांबवा असे सांगायचे सुचले नाही. परंतु, इतरांच्या बाबतीत निरीच्छ असणारे शरद पवार मात्र संजय राऊत यांच्या गळ्याशी प्रकरण आल्यानंतर मोदीजींची भेट घेतात. याच्यावरूनच आपण संजय राऊत यांच्याविषयी जे बोलत होतो ते स्पष्ट होते, असा निशाणा त्यांनी साधला.