नवी दिल्ली – इस्रायली सैनिकांनी रफाह शहरात घातलेल्या छाप्यामध्ये आज दोन इस्रायली ओलिसांची सुटका केली. दक्षिणेकडील अगदी टोकाच्या भागात कडेकोट सुरक्षा असलेल्या अपार्टमेंटवर सैनिकांनी हा छापा घातला होता. ही कारवाई थोड्या काळापुरती होती. मात्र इस्रायलच्या सैन्याला यातून मोठे यश मिळाले.
या कारवाईत महिला आणि मुलांसह किमान ६७ पॅलेस्टिनी ठार झाले, असे पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. बचाव दलांना मदत करण्यासाठी, गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील रफाह शहरामधील अपार्टमेंट जवळील क्षेत्रावर जोरदार हवाई हल्ले झाले.
इस्रायली ओलिसांच्या सुटकेसाठी करण्यात आलेल्या या कारवाईली मिळालेल्या यशाचा आनंद इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आहे. अजूनही १०० पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांना हमासने ओलीस ठेवले आहे.
या ओलीस ऩागरिकांची सुटका करण्याच्या बदल्यात हमासने युद्धबंदीचा प्रस्ताव इस्रायलने फेटाळला आहे. या ओलीस नागरिकांच्या सुटकेसाठी रफाह शहरातच मोठी कारवाई केली जाण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. इस्रायल-हमास युद्धात या भागातून १.४ दशलक्ष पॅलेस्टिनी आतापर्यंत पळून गेले आहेत.