Indian Open Race Walking Competition 2024 : मंजू राणीने पटकावले सलग दुसरे सुवर्णपदक…

Indian Open Race Walking Competition 2024 : आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती मंजू राणीने बुधवारी चंदीगड येथे झालेल्या इंडियन ओपन रेस वॉकिंग स्पर्धा 2024 मध्ये महिलांच्या 10 किमी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. मंजू राणीचे हे चंदीगडमधील दुसरे सुवर्णपदक आहे. मंजू राणीने मंगळवारी महिलांच्या 20 किमी रेस वॉक स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह पदक जिंकले होते.
मंजू राणीने महिलांच्या 10 किमी शर्यतीत 45 मिनिटे 20 सेकंद (45:20) वेळेसह अव्वल स्थान पटकावले. तर पायल (46:04) आणि मोकावी मुथुराथिनम (46:10) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.
मंजू राणीने महिलांच्या 35 किमी रेस वॉकमध्ये भारतासाठी राष्ट्रीय विक्रम केला आहे आणि गेल्या वर्षी झालेल्या इंडियन ओपन रेस वॉकिंग स्पर्धेतही 35 किमी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले पटकावले होते. तसेच तिनं गेल्या वर्षी हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत राम बाबूसोबत 35 किमी मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. मात्र, मंजू राणी आणि राम बाबू यांनी यावेळी चंदीगडमध्ये झालेल्या 35 किमीच्या स्पर्धेत भाग घेतला नाही.
तर दुसरीकडे 35 किमी राष्ट्रीय विक्रमधारक राम बाबू पुरुषांच्या 10 किमी शर्यतीत 41:19 च्या वेळेसह सहाव्या स्थानावर राहिला. त्याचवेळी साहिलने परमजीत बिश्त आणि विकास सिंग यांना हरवून अव्वल स्थान मिळविले. साहिलने 39:25 च्या वेळेसह प्रथम स्थान मिळविले आणि त्यानंतर परमजीत बिश्त (39:36) आणि विकास सिंग (39:47) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर राहिले. परमजीत बिश्त आणि विकास सिंग हे सहा भारतीय खेळाडूंपैकी आहेत ज्यांनी पॅरिस 2024 ऑलिंपिकसाठी पुरुषांच्या 20 किमी रेस वॉक इव्हेंटमध्ये प्रवेश मानक पूर्ण केले आहेत.
पुरुषांची 35 किमी स्पर्धा विजय विश्वकर्माने 2:39:19 च्या वेळेसह जिंकली. सागर जोशीने 2:44:22 वेळेसह दुसरे तर देवेंद्र सिंगने 2:44:58 च्या वेळेसह तिसरे स्थान पटकावले. तर बंदना पटेल (3:11:06), पूजा कुमारी (3:17:51) आणि कोमल (3:23:06) यांनी इंडियन ओपन रेस वॉकिंग स्पर्धा 2024 मध्ये महिलांच्या 35 किमी रेस वॉकमध्ये अनुक्रमे पहिले,दुसरे आणि तिसरे स्थान मिळविले.
इंडियन ओपन रेस वॉकिंग स्पर्धा 2024 चे पदक विजेते
महिला 10 किमी : 1. मंजू राणी – 45:20; 2. पायल – 46:04; 3. मोकावी मुथुराथिनम – 46:10
पुरुषांची 10 किमी : 1. साहिल – 39:25; 2. परमजीत बिश्त – 39:36; 3. विकास सिंग – 39:47
महिला 35 किमी : 1. बंदना पटेल – 3:11:06; 2. पूजा कुमारी – 3:17:51; 3. कोमल – 3:23:06
पुरुषांची 35 किमी : 1. विजय विश्वकर्मा – 2:39:19; 2. सागर जोशी – 2:44:22; 3. देवेंद्र सिंग – 2:44:58
पुरुष 20 किमी : 1. अक्षदीप सिंग – 1:19:38 (NR); 2. सूरज पनवार – 1:19:44; 3.सर्विन – 1:20:03
महिला 20 किमी : 1. मंजू राणी – 1:33:00; 2. पायल – 1:33:28; 3. मुनिता प्रजापती – 1:34.14





