Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धात आतापर्यंत इस्रायलच्या बाजूने 300 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 1590 लोक जखमी झाले आहेत. तर गाझामध्ये या युद्धामुळे 232 लोकांचा मृत्यू झाला आणि 1790 लोक जखमी झाले. समोर आलेल्या माहितीनुसार, हमासने सुमारे 164 इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे. इस्रायलच्या हद्दीत हमासच्या अनेक सैनिकांनी घुसखोरी केली. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्ध घोषित केले असून शत्रूंना याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे.
इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, हमासच्या अतिरेक्यांनी गाझा पट्टीतून 2 हजारांहून अधिक रॉकेट डागले. प्रत्युत्तर म्हणून, इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहराच्या मध्यभागी एक टॉवर उद्ध्वस्त केला.
इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, हमासने हवाई आणि सागरी सीमेवरून 7 ठिकाणांहून घुसखोरी केली असून आमचे सैनिक हमासच्या सैनिकांशी लढत आहेत. दुसरीकडे, हमासने 5 हजार रॉकेट डागल्याचा दावा इस्रायलच्या लष्कराने केला आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार, इस्रायल डिफेन्स अँड सिक्युरिटी फोरमचे सल्लागार डॅनियल सीमन म्हणाले, “सकाळी 6.30 च्या सुमारास हमासने इस्रायलच्या दिशेने एक हजाराहून अधिक रॉकेट डागले. त्यांनी इस्रायली लष्करी चौक्यांवर हल्ला करून त्यांच्या सैनिकांना ठार केले. याशिवाय हमासच्या दहशतवाद्यांनीही अनेक लोकांना ओलीस ठेवले होते. इस्रायलवर डागलेली रॉकेट इराणकडून मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. किमान 2000 जखमींवर इस्रायलच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.