Israel-Hamas War : मध्यपूर्वेतील इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईन यांच्यातील परिस्थिती पुन्हा एकदा चिघळली आहे. हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी शनिवारी गाझा पट्टीवर हल्ला करत फक्त २ मिनिटात इस्रायलवर 5000 रॉकेट डागले असल्याची माहिती समोर आली होती. नंतर जमिनीवरून सतत हल्ले करत त्यांनी इस्रायलमध्ये प्रवेश केला. या युद्धात आतापर्यंत तब्बल १६०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्याचा मास्टरमाईंड असणारा हमासचा प्रमुख मोहम्मद डेफ नेमका आहे कोण ? याची माहिती जाणून घेऊ…
असोसिएटेड प्रेस (एपी) नुसार, हमासचा दहशतवादी नेता मोहम्मद डेफ याने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे कारण दिले आहे. डेफने “ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म’ इस्रायली कब्जा आणि अलीकडील घटनांच्या मालिकेच्या 16 वर्षांच्या नाकेबंदीला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचे म्हटले गेले आहे.
मोहम्मद डेफ कोण आहे?
डेफ हा 2002 पासून हमासच्या दहशतवादी शाखेचा प्रमुख आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रातील माहितीनुसार, 1960 च्या दशकात गाझामधील खान युनिस शरणार्थी शिबिरात त्याचा जन्म झाला. त्याला सुरुवातीला मोहम्मद दीब इब्राहिम अल-मसरी या नावाने ओळखले जात होते. त्यावेळी गाझा इजिप्तच्या ताब्यात होता (1948 ते 1967 पर्यंत). त्यानंतर गाझा 1967 ते 2005 दरम्यान ते इस्रायलच्या अधिपत्याखाली होते आणि नंतर 2005 ते 2007 पर्यंत ते पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या अंतर्गत आले. 2007 मध्ये हमासने सत्तापालट करून सत्ता ताब्यात घेतली. डेफनी गाझा इस्लामिक विद्यापीठात शिक्षण घेतले. डेफच्या काका आणि वडिलांनी 1950 च्या दशकात सशस्त्र पॅलेस्टिनींच्या छाप्यात भाग घेतला होता त्याच भागात शनिवारी हमासच्या सैनिकांनी इस्रायलमध्ये प्रवेश केला होता, असे अहवालात म्हटले आहे.
डेफने हमाससाठी काय केले?
हमासची स्थापना 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात, वेस्ट बँक आणि गाझा पट्टीवरील इस्रायली ताब्याविरुद्ध पहिल्या पॅलेस्टिनी इंतिफादा (उद्रोह) च्या सुरुवातीनंतर झाली. 1967 च्या इस्रायली-अरब युद्धादरम्यान दोन्ही भागांवर इस्रायली कब्जा झाला.
एफटीच्या मते, पहिल्या इंतिफादाच्या वेळी डेफ फाक्त 20 वर्षाचा होता. आत्मघाती बॉम्बस्फोटासाठी त्याला दोषी ठरवून डेफला नंतर इस्रायलींनी तुरुंगात टाकले. इस्रायलच्या म्हणण्यानुसार त्या हल्ल्यात अनेक डझन लोक मारले गेले. 1996 च्या हिंसाचारासाठी डेफला जबाबदार धरण्यात आले होते, ज्यात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
हे बॉम्बस्फोट ऑस्लो शांतता कराराचे उल्लंघन होते, ज्यावर 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला इस्रायल आणि पॅलेस्टिनींचे प्रतिनिधित्व करणारी संस्था पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशने (PLO) स्वाक्षरी केली होती. म्हणजेच इस्रायल सरकार आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन यांच्यात ओस्लो शांतता करार झाला. हमास या कराराच्या विरोधात होता. 1948 च्या अरब-इस्रायल युद्धात इस्रायलने पॅलेस्टिनी भूभागावर कब्जा केला होता, असा त्याचा आरोप जप्त तर या कराराची अंमलबजावणी झाल्यास पॅलेस्टाईनला आणखी जमीन गमवावी लागेल असा दावा त्यांनी केला होता.
एफटीने अहवाल दिला आहे की “डेफला याह्या अय्याशकडून प्रशिक्षण मिळाले होते. बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ असलेल्या याह्या अय्याश आपल्या नावासोबत “इंजिनियर” जोडायचा . दरम्यान, 1996 मध्ये, इस्रायलने स्फोटकांनी भरलेला मोबाईल फोनचा वापर करून याह्या अय्याशची हत्या केली. त्यानंतर डेफ हमासची लष्करी शाखा असलेल्या कसम ब्रिगेडमध्ये सामील झाला.
एका संकेतस्थळानुसार, ‘डेफने जुलै 2002 मध्ये हमासच्या अतिरेकी शाखेचा गाझा कमांडर म्हणून पदभार स्वीकारला असावा, परंतु तो वर्षानुवर्षे इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेड यादीत शीर्षस्थानी होता. इस्रायली सैन्याने डेफला मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी तो वाचला. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने डेफला दहशतवादी घोषित केले आहे. “इस्रायल आणि हमास यांच्यातील 2014 च्या संघर्षादरम्यान, हमासच्या आक्षेपार्ह धोरणामागील सूत्रधार डेफ होता,” असा दावा अमेरिकेने केला होता. 2014 मध्ये, इस्रायलने पुष्टी केली की त्यांनी डेफला मारण्यासाठी घराला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात डेफची पत्नी आणि त्याचा सात महिन्यांचा मुलगा ठार झाला.
त्या वेळी, न्यूयॉर्क टाइम्सने सुरक्षाविषयक बाबींमध्ये तज्ञ असलेल्या इस्रायली पत्रकार रोनेन बर्गमनचा हवाला दिला, असे म्हटले आहे की, “डेफ हा हमासमधील एकमेव प्रमुख लष्करी व्यक्ती आहे जो इतका काळ टिकला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की तो अनेक हत्येच्या प्रयत्नांतून वाचू शकला आहे आणि गंभीर दुखापतींमधून बरा झाला आहे. यामुळे तो बुलेटप्रूफ असल्याची दंतकथा निर्माण झाली.” एफटीनुसार, अनेक जीवघेण्या हल्ल्यांमधून वाचूनही, डेफनी एक हात आणि पाय गमावला. तर त्याने एक डोळा गमवावा लागल्याचा दावा अन्य संस्थांनी केला आहे.