Israel-Hamas war : जगात सध्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरु आहे. हमासने केलेल्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इस्रायलकडून गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले चढवले जात आहेत, या दरम्यान, इराण समर्थक हेजबोला संघटनेचे प्रमुख हसन नसरल्ला यांनीही इस्रायला आणि अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध असेच चालू राहिलं तर त्यांच्यातील युद्ध प्रादेशिक संघर्षात रुपांतरित होईल. जर हे युद्ध इतर देशांमध्येही पसरलं तर याला अमेरिका जबाबदार असेल थेट इशारा हेजबोल्लाहकडून देण्यात आला आहे.
हेजबोलाचे प्रमुख हसन नसरल्ला यांनी पहिल्यांदाच इस्रायल-हमास युद्धावर जाहीर भाष्य केले आहे. त्यांनी,”हे युद्ध लेबनॉनपर्यंत पोहोचण्याकरता अनेक पर्याय खुले आहेत. गाझा पट्टी आणि तेथील लोकांवरील हल्ल्यांना अमेरिका पूर्णपणे जबाबदार आहे आणि इस्रायल मात्र एक माध्यम आहे.” असे म्हणत थेट अमेरिकेवर आरोप केले.
तसेच पुढे बोलताना,“प्रादेशिक युद्ध थांबवायचं असेल तर गाझा पट्टीवरील आक्रमण थांबवावं लागेल”, अशी सूचनाही नसरल्ला यांनी दिली. पूर्व भूमध्य सागरात अमेरिकेने युद्धनौका सज्ज ठेवल्या आहेत. त्यावरही नसरल्ला यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, भूमध्य सागरातील तुमच्या ताफ्याला आम्ही घाबरत नाही. तुम्ही जो ताफा दाखवून घाबरवत आहात त्याविरोधात आम्ही लढायला तयार आहोत. क्षेत्रीय युद्ध सुरू झाल्यास तुमचा ताफा काहीही कामाचा नाही. या युद्धाला हवाई मदतही मिळणार नाही. हे युद्ध सुरू झाल्यास तुमचे लष्कर आणि तुमच्या ताफ्याला किंमत चुकवावी लागणार आहे,” असे म्हणत अमेरिकेला इशारा दिला आहे.
दरम्यान, नसरल्ला यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेनेही याला प्रत्युत्तर दिले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे म्हणाल्या की हिजबुल्लाने चालू असलेल्या संघर्षाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये २००६ पेक्षा जास्त रक्तरंजित युद्ध होण्याची शक्यता आहे. युनायटेड स्टेट्सला या संघर्षाचा विस्तार लेबनॉनमध्ये पाहायचा नाही.”असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.