पिंपरी, दि. 21 – वाढत्या एच 3, एन 2 च्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने खबरदारी म्हणून पाऊले उचलली आहेत. महापालिकेच्या पाच रुग्णालयात या आजाराच्या रुग्णांसाठी आयसोलेशन विभागाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या विभागात प्रत्येकी दहा बेड रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात एच 3, एन 2 चे रुग्ण आढळले आहेत. राज्यात या रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात सध्या या आजाराचा प्रभाव कमी असल्याचे चित्र आहे. सध्या एकही रुग्ण शहरात नसल्याचे महापालिका वैद्यकीय विभाग सांगत आहे. मात्र करोनासारखा आजाराचा विळखा वाढल्यास खबरदारी म्हणून पाऊले उचलण्यास वैद्यकीय विभागाने सुरूवात केली आहे.
महापालिकेच्या वायसीएम, थेरगाव, जिजामाता, तालेरा, भोसरी रुग्णालयात स्वतंत्र आयसोलेशन विभाग सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येकी दहा बेड एच 3, एन 2 च्या आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. भविष्यात या आजाराचे रुग्ण वाढलेच तर हे रुग्णालय त्याच आजारांवर उपचार करण्यासाठी आरक्षित करता येतील, अशी माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली. मात्र सध्या तरी या आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात असून नागरिकांनीही काळजी न करण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाचे प्रमूख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे