पुणे – काश्मिरातील दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुण्यात सोमवारी मध्यरात्री छापा टाकला. त्यांनी एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त असून त्याला दुजोरा मिळू शकला नाही. त्याच्याकडून वादग्रस्त मजकूर असलेले इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त करण्यात आले. या प्रकरणात यापूर्वी पुण्यातील दोन अन्य जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे दहशतवादाच्या पुणे कनेक्शनचा प्रश्न गंभीर होत असल्याचे मानले जात आहे.
इसिस खर्सान या दहशतवादी संघटनेशी कोठौयात राहणाऱ्या तल्जा खान याचा संबंध असल्याची माहिती एका प्रकरणाच्या तपासात एनआयएला मिळाली. त्यानुसार त्याच्या घरावर छापा टाकला. त्याच्या लॅपटॉप आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. दरम्यान, स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तल्हा खान याला एनआयएने ताब्यात घेतले. मात्र, त्याला एनआयएकडून दुजोरा मिळालेला नाही.
कोंढवा परिसरात तल्हा खान (38) राहतो. इसिसशी त्याच्या संबंधाबाबत त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. देशातील अल्पसंख्याक समाजाच्या तरुणांची भरती इसिसमध्ये करण्याच्या कामात सहभागी असल्याच्या आरोपावरून तसेच देशभरात घातपाती कारवायाच्या तयारीत असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) 8 मार्च 2020 रोजी दिल्लीतून जैनब सामी वाणी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग (रा. जामियानगर, दिल्ली) या काश्मिरी दाम्पत्याला अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून पुण्यातील एका युवतीसह नबील सिद्दीकी खत्री यांना अटक केली होती.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत खानचे नाव समोर आले. या प्रकरणाचा तपास एनआयएकडून करण्यात येत असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एनआयचे पथक पुण्यात तपास करत आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार तल्हा खान याचा इसिसशी संबंध असल्याचा संशय असल्याने एनआयच्या पथकाने त्याच्या कोंढव्यातील घरात छापा टाकून काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त केल्या. याप्रकरणात खान याची चौकशी सुरू असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली.