गोपनीय माहिती पुरवणाऱ्या 23 वर्षीय भारतीय युवकाला वाराणसीतून अटक
नवी दिल्ली – पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडून आयएसआयचा हस्तक बनून देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देणाऱ्या युवकाला रविवारी उत्तर प्रदेश दहशतवाद प्रतिबंधात्मक पथकाने (एटीएस) अटक केली.
महंमद रशीद असे या युवकाचे नाव आहे, रशीद वाराणसीत आयएसआयसाठी काम करत असे. 2019 पासून तो पाकिस्तान गोपनीय माहिती पाठवत असे. त्याला त्याच्या स्मार्टफोनसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्या फोनमध्ये लष्करी संस्थांची आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तळाची छायायचित्रे आढळून आली. हे व्हिडिओ आणि माहिती पाठवल्याबद्दल त्याला पैसे आणि भेटवस्तू मिळत असत. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे एटीएसच्या निवेदनात म्हटले आहे.
त्याने भारतात किती ठिकाणी भेट दिली आणि छायाचित्रे काढली, याची माहिती त्याच्याकडून घेण्यात येत आहे. त्याला किती पैसे अथवा भेटवस्तू मिळाले, या गुन्ह्यात आणखी कोण सहभागी आहे, याची चौकशी करण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.