पुणे : टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत असताना टोमॅटो पिकवणारा शेतकरी मात्र खुश आहे. पुण्यातील एका शेतकऱ्याने भाववाढ झाल्यामुळे टोमॅटोपासून तब्बल कोट्यवधींची कमाई केली आहे. गेल्या महिन्याभरात या शेतकऱ्याने एक नाही दोन नाही तर तब्बल ३ कोटी रुपये कमावले आहेत.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पाचघर गावातील शेतकरी ईश्वर गायकर (३६) यांच्या म्हणण्यानुसार, कमी भावामुळे त्यांना यावर्षी मे महिन्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे पीक फेकून द्यावे लागले. असं असलं तरी हार न मानता त्यांनी जिद्द दाखवत आपल्या 12 एकर शेतात पुन्हा टोमॅटोची लागवड केली. आता टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किमतींमध्ये गायकर यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि ते करोडपती झाले. गायकर यांचा दावा आहे की त्यांनी 11 जून ते 18 जुलै दरम्यान टोमॅटोचे उत्पादन विकून 3 कोटी रुपये कमावले आहेत.
“या कालावधीत, त्यांनी जुन्नर तहसीलमधील नारायणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) येथे टोमॅटोचे 18,000 कॅरेट (प्रत्येकी 20 किलो टोमॅटो) 3 कोटी रुपयांना विकले आहेत,” गायकर यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. उर्वरित 4,000 कॅरेट टोमॅटो विकून सुमारे 50 लाख रुपये कमावण्याचा त्यांचा मानस आहे. टोमॅटोची लागवड आणि वाहतुकीवर एकूण 40 लाख रुपये खर्च झाल्याचे गायकर यांनी सांगितले. ते म्हणाले, माझ्याकडे १८ एकर जमीन आहे. यातून मी 12 एकरात टोमॅटोची लागवड केली. 11 जूनपासून टोमॅटोचे 18,000 कॅरेट विकून मी 3 कोटी रुपये कमावले आहेत.
गायकर यांनी 11 जून रोजी 770 रुपये प्रति कॅरेट (37 ते 38 रुपये प्रति किलो) टोमॅटोची विक्री केली. 18 जुलै रोजी त्याला प्रति कॅरेट 2,200 रुपये (110 रुपये प्रति किलो) मिळाले. गायकर यांनी दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोचे पीक कमी भावामुळे फेकून द्यावे लागले होते याची आठवण देखील यावेळी करून दिली.
”टोमॅटो उत्पादकांसाठी हा सर्वोत्तम काळ आहे, परंतु आम्ही सर्वात वाईट वेळ देखील पाहिली आहे. मे महिन्यात मी एक एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड केली, परंतु मोठ्या प्रमाणात उत्पादन फेकून द्यावे लागले कारण भाव खूपच कमी होते,” ते म्हणाले. प्रति कॅरेट दर फक्त 50 रुपये, म्हणजे 2.50 रुपये प्रति किलो असल्याने मी उत्पादन फेकून दिले होते.
गायकर यांनी सांगितले की 2021 मध्ये त्यांना 15 लाख ते 16 लाख रुपयांचा तोटा झाला होता आणि गेल्या वर्षीही त्यांना किरकोळ नफा झाला होता. नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी अक्षय सोलाट यांनी गायकर यांचा शेतमाल खरेदी केला आहे. सोलाट म्हणाले की, सध्या टोमॅटोची बाजारपेठ तेजीत आहे. त्यांनी टोमॅटोची खरेदी 2,400 रुपये प्रति कॅरेट दराने केली. ते म्हणाले, “मी गेल्या 15 वर्षांपासून या व्यवसायात आहे. पण टोमॅटोमध्ये एवढी तेजी यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नव्हती.