यवत-यवत पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या केडगाव येथील नवीन मुठा उजवा कालवा वितरीका क्रमांक 23 वरील हंडाळवाडी मायनर येथे कालव्याच्या पाण्याची कोणीही चोरी करू नये म्हणून आउटलेट वेल्डिंग करण्याचे काम करीत असताना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याला दोघा जणांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघा आरोपी विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखील सदाशिव गायकवाड व अक्षय सदाशिव गायकवाड (दोघे रा. केडगाव, धुमळीचा मळा, ता. दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सोमनाथ पांडुरंग रंधवे (वय 34, रा. केडगाव पाटबंधारे वसाहत, ता. दौंड) हे केडगाव येथील नवीन मुठा उजवा कालवा क्रमांक 23 येथे गेली सात वर्षांपासून कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
वितरेकेतून पाणी चोरी होऊ नये म्हणून रंधवे हे आपले सहकारी व काही शेतकऱ्यांना घेऊन रविवारी सायंकाळच्या सुमारास वितरीका 23 वरील आउटलेटला वेल्डिंग करीत होते. यावेळी आरोपींनी रंधवे यांना मारहाण करीत सरकारी कामात अडथळा आणला. तर भांडणे सोडवणारे रंधवे यांचे इतर सहकारी व काही शेतकरी यांना आरोपी अक्षय गायकवाड याने खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली.