लंडन – आयरिश लेखक पॉल लिंच यांच्या प्रॉफेट सॉंग या कादंबरीला यंदाचा साहित्य क्षेत्रातील मानाचा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय वंशाच्या लेखिका चेतना मारू यांच्या वेस्टर्न लेन या कादंबरीला मागे टाकून लिंच यांच्या कादंबरीने हा पुरस्कार पटकावला आहे.
त्यांना ५० हजार पौंडांचे पारितोषिक मिळाले. लंडनमधील ओल्ड बिलिंगगेट येथे झालेल्या समारंभात गेल्या वर्षीचे बुकर पुरस्कार विजेते श्रीलंकेचे शेहान करुणातिलका यांच्या हस्ते लिंच यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निरंकुशवादाची पकड असलेल्या आयर्लंडबाबत घडू शकणाऱ्या संभाव्य आरिष्टांबाबत कल्पित मनोभूमिकेचे वर्णन या कादंबरीमध्ये केले गेले आहे. या मनोभूमिकेतून मूलगामी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे लेखकाने म्हटले आहे. लोकशाही मूल्ये नष्ट होत असलेल्या नवीन जगात डबलिन येथे राहणाऱ्या एका कुटुंबाची धडपड प्रॉफेट सॉंग या कादंबरीमध्ये मांडण्यात आली आहे.
पाश्चात्य देशांमधील लोकशाहीवादी देशांमधील अस्वस्थता या कादंबरीमध्ये मांडण्यात आली आहे. सीरियाची समस्या सर्व जगावर लादली गेली शरणार्थ्यांची समस्या आणि पाश्चात्यांमधील मतभेद हे सर्वआधुनिक गोंधळाचे चित्र या कादंबरीमध्ये चित्रित केले गेल्याचे लिंच यांनी सांगितले.
बुकर पुरस्कार जिंकणारे लिंच हे आयर्लंडमधील पाचवे लेखक ठरले आहेत. त्यांच्यापूर्वी आयरिस मर्डोक, जॉन बॅनविले, रॉडी डॉयल आणि एना एनराईट यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.