मुंबई – प्रमुख फलंदाजांना आलेल्या अपयशानंतर नितीश राणा व आंद्रे रसेल यांनी केलेल्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 8 गडी गमावून 175 धावा केल्या.
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत कोलकाताला पहिल्यांदा फलंदाजी दिली. हैदराबादच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर कोलकाताचे नावाजलेले फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. कर्णधार श्रेयस अय्यरने सुरुवात चांगली केली मात्र, त्याला उमरान मलिकचा यॉर्कर खेळताच आला नाही व 28 धावांवर त्याचा त्रिफळा उडाला. त्यानंतर राणाने एक बाजू सावरत संघाच्या धावसंख्येचे शतक फलकावर लावले.
या सामन्याद्वारे संघात परतलेल्या ऍरन फिंचसह व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन व शेल्डन जॅक्सन यांनी साफ निराशा केली. मात्र, त्याचवेळी आंद्रे रसेलने राणाला सुरेख साथ देत संघाचा डाव सावरला. या जोडीने संघाला दीडशतकी मदल मारुन दिली. राणाने आपले अर्धशतक पूर्ण केले मात्र, धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 54 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 36 चेंडूत 6 चौकार व 2 षटकार फटकावले.
रसेलनेही आक्रमक फलंदाजी केली मात्र, तळात त्याला फलंदाजीची संधी कमी मिळाल्याने त्याचे अर्धशतक पूर्ण होऊ शकले नाही. त्याने आपल्या नाबाद 49 धावांच्या खेळीत 25 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. कोलकाताचा डाव 20 षटकांत 8 बाद 175 धावांवर रोखला गेला. हैदराबादकडून टी. नटराजनने 3 तर उमरान मलिकने 2 गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन व जगदीशा सुचित यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक – कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 8 बाद 175 धावा. (नितीश राणा 54, श्रेयस अय्यर 28, आंद्रे रसेल नाबाद 49, टी. नटराजन 3-37, उमरान मलिक 2-27).