नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी यंदा जोरदार तयारी सुरू केलेल्या रॉयल चॅलेंजर बेंगळूरू (आरसीबी) संघाला चांगलाच धक्का बसला आहे. स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलिप्सने अचानक यंदाच्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या फिलिप्सने वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याच्या जागी न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज फिन एलनला संघात स्थान दिले आहे. फिलीपीने आयपीएलच्या गेल्या वर्षीच्या मोसमात आरसीबीकडून पदार्पण केले होते.
सलामीला फलंदाजी करताना त्याने 5 सामन्यातून केवळ 78 धावाच केल्या होत्या. मात्र, यंदाच्या स्पर्धेत त्याच्याकडून सर्वोत्तम खेळाची अपेक्षा केली जात होती. दरम्यान, आयपीएल लिलावात फिनवर कोणीही बोली लावली नव्हती. त्याची बेस प्राईस 20 लाख होती. मात्र, आता फिलिप्सने माघार घेतल्याने फिनला खेळण्याची संधी मिळाली आहे.