लखनौ – भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला. असी कामगिरी करणारी मिताली ही पहिलीच भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तसेच हा टप्पा पार करणारी मिताली ही जगभरात केवळ दुसरीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
याआधी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्डसनं 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. हा पल्ला गाठल्यावर एडवर्डस निवृत्त झाली. मात्र, मिताली अद्याप खेळत असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही ती लवकरच साकार करेल.
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघात एकदिवसीय मालिका सुरू असून त्यात मितालीने शुक्रवारी हा विक्रम आपल्या नावे केला. 10 हजार धावा पूर्ण करण्यासाठी मितालीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 310 सामने खेळले आहेत. त्यात 10 कसोटी सामने, 211 एकदिवसीय सामने तर, 82 टी 20 सामन्यांचा समावेश आहे.
1999 साली आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जवळपास 22 वर्षांहून अधिक काळ मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.
मितालीच्या विक्रमांची रेलचेल
मितालीच्या नावे अजून एक विक्रम नोंदला गेला असून ती क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार बनलेली महिला क्रिकेटपटू बनली आहे. तसेच 200 पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम देखील तिच्याच नावावर आहे. त्याच बरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 6 हजार 938 धावांचा विक्रमही तिच्या नावावर नोंदला गेला आहे. सलग 111 एकदिवसीय सामने खेळण्याची कामगिरीही तीने केली आहे.