#IPL2021 : पृथ्वी शॉची वादळी खेळी

दिल्लीचा कोलकातावर 7 गडी राखून विजय

अहमदाबाद  -सलामीवीर पृथ्वी शॉने केलेल्या वादळी खेळीच्या मदतीने दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. कोलकाताने दिलेले 155 धावांचे आव्हान दिल्लीने 16.3 षटकातच 3 गड्यांच्या मोबदल्यात 156 धावा करत पार केले.

दिल्लीच्या सलामीवीरांनी कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम फोडला. पृथ्वी शॉने शिवम मावीच्या पहिल्याच षटकात तब्बल 24 धावा कुटत कोलकाताच्या मनसुब्यावर पाणी फेरले. तसेच पुढे जात आयपीएल 2021 मधील सर्वाधिक जलद अर्धशतक देखील साकारले. पृथ्वी शॉला शिखर धवनने देखील उत्तम साथ देत कोलकाताच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्यामुळे दिल्लीने एकही विकेट न गमावता 12 षटकात तब्बल 113 धावा ठोकत संघाला विजयासमीप नेले.

पॅट कमिन्सने 14व्या षटकात शिखर धवनला पायचित केले. धवनने 46 धावांची खेळी केली. विजयासाठी 9 धावांची आवश्‍यकता असताना कमिन्सने पृथ्वीला बाद केले. पृथ्वीने 41 चेंडूत तब्बल 11 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी करत 82 धावांची तुफान खेळी केली. त्यानंतर मार्कस स्टॉयनिसने चौकार मारत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना नितीश राणा आणि शुभमन गिल यांनी कोलकाताला सावध सुरुवात करून दिली. अक्षर पटेलने नितीश राणाला बाद करत कोलकाताला पहिला दणका दिला. त्यानंतर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी पहिल्या पॉवरप्लेपर्यंत 45 धावा केल्या. अर्धशतकी भागीदारीकडे कूच करत असताना मार्कस स्टॉयनिसने 10व्या षटकात राहुल त्रिपाठीला (19) माघारी धाडले.

राहुलनंतर आलेल्या कर्णधार ईऑन मॉर्गन आणि सुनील नारायण अपयशी ठरले. मागील काही सामन्यात अपयशी ठरलेला शुभमन गिल या सामन्यात चांगल्या लयीत दिसला. शुभमनने 38 चेंडूत 3 चौकार आणि एक षटकार खेचत 43 धावांची खेळी केली. यानंतर अखेरच्या षटकांमध्ये आंद्रे रसेलने केलेल्या फटकेबाजीमुळे कोलकाताला 154 धावांपर्यंत मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक –

कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत
6 बाद 154 (शुभमन गिल 43, आंद्रे रसेल नाबाद 45, दिनेश कार्तिक 14. ललित यादव 2-13, अक्षर पटेल 2-32). दिल्ली कॅपिल्टस – 16.3 षटकांत 3 बाद 156 (पृथ्वी शॉ 82, शिखर धवन 46, ऋषभ पंत 16. पॅट कमिन्स 3-24).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.