नवी मुंबई – सिडको गृहनिर्माण योजना 2018-19 मधील घरांचे (सदनिकांचे) हफ्ते थकीत असणाऱ्या तसेच ज्यांनी घरांचा एकही हफ्ता भरलेला नाही, अशा अर्जदारांना उर्वरित हफ्ते भरण्याकरिता 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. सिडको महामंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्र शासनाच्या सर्वांसाठी घरे धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना 2018-19 अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोडमध्ये सुमारे 25,000 घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता साकारण्यात आली होती. ()
सदर अंतिम मुदतीपर्यंत संबंधित अर्जदारांनी थकित हफ्त्यांचा भरणा करावयाचा आहे. या निर्णयामुळे संबंधित अर्जदारांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.याकरिता संबंधित अर्जदारांनी सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या संकेस्थळास भेट देऊन, त्यावरील Online Payment या टॅबचा वापर करून आपल्या थकीत हफ्त्यांच्या संपूर्ण रकमेचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करावायाचा आहे. दिलेल्या मुदतवाढीचा संबंधित अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
सदर योजनेची संगणकीय सोडत पार पडल्यानंतर यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येऊन पात्र ठरलेल्या अर्जदारांना सदनिकेच्या किमतीच्या रकमेचा ठराविक हफ्त्यांमध्ये भरणा करण्यासाठी वेळापत्रक देण्यात आले होते. परंतु त्यानंतर काही अर्जदारांनी एकाही हफ्त्याचा भरणा न केल्याचे तर काही अर्जदारांचे हफ्ते थकीत असल्याचे आढळून आले होते. सदर अर्जदारांच्या विनंतीवरून सदनिकेचे हफ्ते भरण्यासाठी 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या अंतिम तारखेपर्यंतही काही अर्जदार हफ्ते भरण्यास असमर्थ ठरले होते.
महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील काही अर्जदारांनी एकही हफ्ता न भरल्याचे तर काही अर्जदारांचे उर्वरित हफ्ते थकीत असल्याचे आढळून आले आहे. कोविड-19 मुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित अर्जदारांना थकीत हफ्ते भरण्याकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर योजनेतील सर्व अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणे, या बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सिडको महामंडळाने सदनिकेचा एकही हफ्ता न भरलेल्या आणि उर्वरित हफ्ते थकीत असणाऱ्या संबंधित अर्जदारांना हफ्ते भरण्याकरिता 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याच तसेच 25 मार्च 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत थकीत हफ्त्यांवर लागू होणारे विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.