#IPL2021 : सहभागी संघातील खेळाडूंना विलगीकरणाची सक्‍ती

मुंबई – देशात करोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत असल्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी बीसीसीआय व आयपीएल समितीने काही नवे नियम तयार केले आहेत. त्यानुसार या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सगळ्या खेळाडूंना स्पर्धेपूर्वी सात दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.

स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होतात. त्यात प्रत्येक संघात किमान 23 खेळाडूंचा समावेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याच बरोबर प्रत्येक संघासह सपोर्ट स्टाफचेही काही सदस्य असतात. या सर्वांना स्पर्धेतील सामन्यांच्या ठिकाणी दाखल झाल्यावर स्पर्धेपूर्वी आपल्याच हॉटेलमधील रुममध्ये सात दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.

सर्व खेळाडू, सहायक कर्मचारी व सदस्य यांनी बायोबबलमध्ये प्रवेश करणे बंधनकारक असून त्यानंतर त्यांना त्यातून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. या कालावधीत प्रत्येक व्यक्‍तीची करोना चाचणी केली जाणार असून त्याचा अहवाल आल्यावरच पुढील सवलतींबाबत विचार केला जाणार आहे. त्यांचा अहवाल जर निगेटिव्ह आला तर लगेचच त्यांना सरावाची परवानगीही मिळेल.

यंदाच्या स्पर्धेला येत्या 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.